इशरत जहाँ प्रकरणातील अनेक कागदपत्रे गायब असल्याचे सांगत आधीच्या काँग्रेस सरकारने या प्रकरणी कोलांटउड्या मारल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरूवारी संसदेत केला. दहशतवादाशी निगडीत कोणत्याही मुद्द्याचे राजकारण करणे टाळले पाहिजे. मग ते इशरत जहाँ किंवा अन्य कोणतेही प्रकरण असो. अशा प्रकरणांमध्ये सरकारने कोलांटउड्या मारणे टाळले पाहिजे. मात्र, दुर्देवाने यूपीए सरकारच्या काळात इशरत जहाँ प्रकरणात तसे करण्यात आल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले. यूपीए सरकारने इशरत जहाँ लष्कर-ए-तैयबाची सदस्य असल्याचे पुरावे कमकुवत केले. तत्कालिन गृह सचिव व सीबीआयने अॅटर्नी जनरलना लिहिलेली महत्त्वाची पत्रे गायब असल्याची माहिती राजनाथ सिंह यांनी संसदेत दिली. दहशतवादाच्या मुद्द्यावर जाती किंवा धर्म आड येता कामा नये. मात्र, त्यावेळी गुजरातचे तत्कालिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र रचण्यात आले. याप्रकरणात यूपीए सरकारने पहिल्यांदा सादर केलेले प्रतिज्ञापत्र बदलले. मात्र, डेव्हिड हेडलीच्या साक्षीने या माहितीला पुष्टी मिळाल्याचे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.