गुजरात विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर भाजपकडून विजयोत्सव साजरा केला जात असताना ‘१५० जागांचा दावा करणाऱ्या मोदी आणि शहांचा अहंकार उद्ध्वस्त झाला,’ असे वक्तव्य गुजरातमधील नवनिर्वाचित आमदार आणि तरुण दलित नेता जिग्नेश मेवानी यांनी केले आहे. इतकेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देताना २०१९ मध्ये हीच परिस्थिती त्यांना पुन्हा पाहायला मिळेल असा दावाही त्यांनी केला.

गुजरात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विविध राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत होते. मात्र, आता निवडणुकीनंतरही ही मालिका कायम आहे. गुजरातमधील उना येथे दलितांवर झालेल्या अत्याचारानंतर तीव्र आंदोलनातून जिग्नेश मेवानी हा तरुण दलित नेता उदयास आला. एका मुलाखतीदरम्यान जिग्नेश यांनी मोदी-शहा यांच्यावर कडाडून टीका केली.

गुजरात निवडणुकीत १५० जागा मिळतील असा दावा करणाऱ्या मोदी-शहा यांचा अहंकार मोडून निघाला असून मोदींनी आता राजकारणातून सन्यास घ्यावा असा घणाघात मेवानी यांनी केला. मोदींवर टीका केल्याबद्दल राहुल गांधींनी जरी आपल्याला माफी मागायला सांगितली तरी आपण माफी मागणार नाही, असेही त्यांने म्हटले.
मेवानी पुढे म्हणाले, ‘२०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आता म्हातारे झाले आहेत. ते लोकांना आपले जुने कंटाळवाणे भाषण सतत ऐकवत आहेत. त्यांनी राजकारणातून आता ब्रेक घ्यायला हवा, निवृत्त व्हायला हवे. मोदींनी हिमालयात जाऊन ध्यान करावे,’ असा वादग्रस्त सल्लाही मेवानी यांनी दिला आहे.

मेवानी म्हणाले, गुजरातचा निकाल हा आमच्या आंदोलनाचा विजय आहे. यापुढे आम्ही विधानसभा आणि रस्त्यावर आमच्या आंदोलनावर आणखी जोर देणार आहोत तसेच २०१९मध्ये भाजपची सत्तेतून हटवणार आहोत. देशाला आता आमच्यासारख्या दलित, आंदोलनातून निघालेल्या तरुणांची गरज आहे. देशाला तोडणारे राजकारण आता लोकांच्या लक्षात यायला लागले आहे.