पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत फोनवरुन चर्चा केली. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर प्रथमच पंतप्रधान मोदींनी जो बायडेन यांच्यासोबत चर्चा केली.
पंतप्रधान मोदींनी सर्वप्रथम जो बायडेन आणि भावी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या. मोदींनी यावेळी भारत-अमेरिका रणनितीक भागीदारीसाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला तसेच दोन्ही देशांचे प्राधान्यक्रम आणि चिंतांबद्दल चर्चा केली.

“अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना फोन करुन अभिनंदन केलं. भारत आणि अमेरिकेतील धोरणात्मक भागीदारीसंबंधी आपल्या वचनबद्धतेचा यावेळी पुनरुच्चार केला. याशिवाय आम्ही करोना महामारी, हवामान बदल, इंडो-पॅसिफिक भागात सहकार्य अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा केली” असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या फोन कॉलनंतर केलेल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.

कोविड-१९ सह जागतिक अर्थव्यवस्थेबाबत जो बायडेन यांना भारतासोबत अनेक मुद्यांवर काम करायचे आहे असे त्यांच्या टीमने म्हटले आहे. “कोविड-१९, वातावरण बदल, अर्थव्यवस्थेला रुळावर आणणे, देशात आणि परदेशात लोकशाही बळकट करणे, इंडो-पॅसिफिक क्षेत्र व अन्य जागतिक आव्हानांच्या विषयावर बायडेन यांना पंतप्रधान मोदींसोबत काम करायचे आहे” असे बायडेन यांच्या टीमने म्हटले आहे. पंतप्रधान मोदींनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल बायडेन यांनी आभार मानले. भारत-अमेरिका रणनितीक संबंध अधिक बळकट करण्याबरोबरच विस्तारण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.