बालाकोट एअर स्ट्राइकनंतर दुसऱ्या दिवशी भारताविरोधात F-16 फायटर विमानांचा वापर करणाऱ्या पाकिस्तानला अमेरिकेने फैलावर घेतल्याचे समोर आले आहे. F-16 फायटर विमानांचा गैरवापर केल्याबद्दल अमेरिकेन पाकिस्तानच्या हवाई दल प्रमुखांची कानउघडणी केल्याचे वृत्त अमेरिकन माध्यमांनी दिले आहे.

तत्कालिन शस्त्र नियंत्रण आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा विषयाच्या उपमंत्री अँड्रीया थॉम्पसन यांनी पाकिस्तानच्या हवाई दलाचे प्रमुख मार्शल मुजाहिद अन्वर खान यांना ऑगस्ट महिन्यात पत्र पाठवले होते. त्या पत्रातून अमेरिकेने एफ-१६ विमानाच्या वापराबद्दलची आपली नाराजी कळवली होती.

बालाकोट एअर स्ट्राइकनंतर घडलेल्या घटनाक्रमाचा त्यामध्ये थेट उल्लेख नव्हता. पण या पत्राचा रोख फेब्रुवारी महिन्यात भारताविरोधात F-16 विमान वापरले त्याकडे होता. “राष्ट्रीय सुरक्षेच्या उद्दिष्टासाठी तुम्ही F-16 विमानाचा वापर केल्याचे आम्हाला तुमच्याकडून समजले. पण अमेरिकन सरकारशी संबंधित नसलेल्या तळांवर या विमानांना हलवणं ही आमच्यासाठी चिंतेची बाब असून हे F-16 विमानांसंबंधी झालेल्या कराराशी सुसंगत नाही” असे थॉम्पसन यांनी आपल्या पत्रात स्पष्टपणे म्हटले आहे.

नेमकं काय घडलं होतं ?
१४ फेब्रुवारीला पुलवामामध्ये जैश-ए-मोहम्मदच्या आत्मघातकी हल्लेखोराने केलेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. त्यानंतर भारताने २६ फेब्रुवारीला बालाकोटमधील जैशच्या तळावर एअर स्ट्राइक करुन हिशोब चुकता केला. भारताच्या या कारवाईने बिथरलेल्या पाकिस्तानने प्रतिहल्ल्याचा प्रयत्न केला. २७ फेब्रुवारीला पाकिस्तानी फायटर विमाने भारताच्या हवाई हद्दीत घुसली होती. यावेळी भारताने पाकिस्तानचे एक F-16 विमान पाडले व त्यांचा हल्ल्याच डाव उधळून लावला.