चीन आणि भारत या दोन्ही देशांची स्थिती सध्या दयनीय आहे. जगभरात करोना परसवला असा चीनवर आरोपही होत आहे. चीनच्या सरकारला लोकांना उत्तर देताना नाकीनऊ आले आहे. करोनाची परिस्थिती कशी हाताळावी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समजलं नाही. त्यामुळे आर्थिक व्यवस्थाही ढासळली आहे. आंतरराष्ट्रीय संस्थेनं भारताना कंगाल म्हणून जाहीर केलं आहे. दोन्ही देशांना आपल्या जनतेला फसवायचं आहे आणि म्हणून भारताचे पंतप्रधान आणि चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी लुटुपुटूची लढाई सीमेवर सुरु केली आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला.

गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीन सीमेवर तणावाचं वातावरण आहे. तसंच चीननंही मोठ्या प्रमाणावर सीमेवर फौजफाटा तैनात केला आहे. तर दुसरीकडे भारतानंही मोठ्या प्रमाणात सीमेवर सैनिक तैनात केले आहेत. करोनासहित या संपूर्ण प्रकणावर आंबेडकर यांनी भाष्य केलं. त्यावेळी ते बोलत होते. यासंदर्भात त्यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

“दोन्ही देशांना आपल्या नागरिकांना फसवायचं असल्यानं सीमेवर लुटुपुटूची लढाई सुरू करण्यात आली आहे. कधी लडाख, आसाम, अरुणाचल प्रदेश तर कधी सिक्कीमच्या सीमेवर ही लढाई होते. परिस्थिती अजून युद्धासारखी झाली नाही किंवा दोन्ही देश युद्ध करू शकतील अशीही परिस्थिती नाही,” असं आंबेडकर म्हणाले. “चीनपासून निश्चितच धोका आहे. पण सध्या भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हा खेळ सुरू आहे. परंतु तेदेखील त्यांच्या लोकांशी त्रस्त आहे. आपल्या देशातील सरकारला आर्थिक धोरणं कशाप्रकारे बदलावी हे कळत नसल्याने तेही त्रस्त आहेत. यांच्या असल्या प्रचाराला बळी पडू नये,” असंही त्यांनी नमूद केलं.