परदेशातून मिळालेल्या निधीचा गैरवापर केल्याच्या आरोपावरून सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड आणि त्यांचे पती जावेद आनंद यांना अटक करून त्यांची चौकशी करण्याची परवानगी द्यावी, यासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सेटलवाड आणि त्यांच्या पतीला दिलेल्या अटकपूर्व जामीनाला सीबीआय सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे.
‘फॉरेन काँट्रिब्युशन रेग्युलेशन अॅक्ट’मधील तरतुदींचे सेटलवाड यांनी उल्लंघन केले आहे. परदेशातून मिळालेल्या निधीचा त्यांनी गैरवापर केला असून, त्यामुळे सामाजिक सौहार्दतेचे वातावरण धोक्यात आले आहे, असा आरोप सीबीआयने केला असून, त्यासाठी आवश्यक पुरावेही या संस्थेने जमविले आहेत. सकृतदर्शनी हे दोघेही दोषी असल्याचे दिसून येत असल्यामुळेच त्यांचा अटकपूर्व जामीन रद्द करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
केंद्राकडून आवश्यक असलेली मान्यता न घेताच सेटलवाड यांच्या ‘सबरंग कम्युनिकेशन अॅण्ड पब्लिशिंग प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीने अमेरिकेतील फोर्ड फाऊंडेशनकडून १.८ कोटी रुपयांचा निधी गोळा केला, असे सीबीआयचे म्हणणे आहे. सेटलवाड आणि त्यांच्या पतीने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. गुजरात दंगलीतील पीडितांची बाजू घेतल्यानेच आपल्याला लक्ष्य करण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 25, 2015 3:49 pm