गुजरातच्या साबरकाठा जिल्ह्यात एका 14 महिन्यांच्या बालिकेवर बलात्काराची घटना समोर आल्यापासून येथे उत्तर प्रदेश आणि बिहारच्या नागरिकांना लक्ष्य केलं जात आहे. गुजरातमध्ये यूपी-बिहारींविरोधात संतापाची लाट उसळली आहे. रविवारीही दोन ठिकाणी हल्ले झाले. गुजरातचे डीजीपी शिवानंद झा यांनी दिलेल्या माहितीनुसार, अशाप्रकारे हल्ला होण्याचे आतापर्यंत एकूण 42 गुन्हे दाखल झाले असून 342 जणांना अटक करण्यात आली आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, हिंसेच्या भीतीने परराज्यांतून विशेषतः उत्तर प्रदेश आणि बिहारमधून आलेल्या कामगारांनी पलायन करण्यास सुरुवात केली आहे.
बुधवारपासून गुजरातच्या गांधीनगर, मेहसाणा, पाटन, साबरकाठा ते अगदी अहमदाबाद या ५ जिल्ह्यांमध्ये यूपी-बिहारींविरोधात हिंसक आंदोलनांनी पेट घेतला आहे. त्यामुळे बिघडलेल्या परिस्थितीमुळे गुजरातमधील अनेक उत्तर प्रदेश आणि बिहारच्या कामगारांनी पळ काढला आहे. मेहसाणा आणि साबरकाठा या जिल्ह्यांमध्ये परिणाम सर्वाधिक जाणवत आहे, तर अहमदाबाद येथून आतापर्यंत 73 आणि गांधीनगर येथून 27 जणांना अटक करण्यात आली आहे. सोशल मीडियावर चिथावणीखोर पोस्ट व्हायरल केल्या प्रकरणीही 6 जणांना अटक करण्यात आली आहे. परप्रांतीय ज्या भागात मोठ्या संख्येने रहातात तिथे पोलिसांच्या गस्त वाढवल्या असून परिस्थिती चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन गुजरात पोलिसांना सतर्कतेचा आदेश देण्यात आल्याची माहिती आहे. रविवारी वघोडिया इंडस्ट्रियल परिसरात दोन कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या परप्रांतीयांवर कोटांबी आणि कामरोल गावातील 17 जणांनी हल्ला केला, तसंच न्यू रानिप परिसरातही हल्ला झाल्याची माहिती आहे.
का होतायेत हल्ले? – चिमुकलीवरील बलात्कार प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात रविंद्र साहू या आरोपीला अटक केली. रविंद्र साहू हा मूळचा बिहारचा आहे हे समोर येताच, त्याच्या अटकेनंतर गुजरातमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारच्या कामगारांवर हिंसक हल्ले होण्यास सुरुवात झाली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 8, 2018 3:38 am