विविध कारणांमुळे अधूनमधून चर्चेत असणारी फुड डिलिव्हरी कंपनी झोमॅटो आज पुन्हा एका वादामुळे चर्चेत आली आहे. बीफ आणि डुकराचे मटण डिलिव्हर करण्यावरुन हा वाद निर्माण झाला असून झोमॅटोच्या फूड डिलिव्हरी एक्झेक्युटिव्हजने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. पश्चिम बंगालमधील हावडा शहरातील झोमॅटोचे हे कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत.

एका आंदोलनकर्त्या एक्झेक्युटिव्हने सांगितले की, कंपनी आमच्या मागण्यांकडे लक्ष देत नाहीए. आमच्यावर बीफ आणि डुकराचे मटण डिलिव्हर करण्यासाठी दबाव टाकला जात आहे. यासाठी आम्ही एक आठवड्यापासून संपावर आहोत.

हे प्रकरण तापत असल्याचे लक्षात येताच पश्चिम बंगालचे मंत्री राजीब बॅनर्जी हे तोडग्यासाठी पुढे आले आहेत. त्यांनी म्हटले की, झोमॅटोने कोणत्याही कर्मचाऱ्याला त्यांच्या धर्माविरोधात आचरण करण्यासाठी जबरदस्ती करता कामा नये, हे चुकीचे आहे. माझ्याकडे याबाबत तक्रार आली असून यावर मी तोडगा काढण्याचा प्रयत्न करेन.

दरम्यान, जुलै महिन्यात मध्य प्रदेशातील जबलपूर येथील अमित शुक्ला नामक एका झोमॅटो ग्राहकाने मुस्लिम डिलिव्हिरी बॉयच्या मार्फत जेवण पाठवल्यावर आक्षेप घेत आपली ऑर्डर रद्द केली होती. तसेच झोमॅटोचे अॅप अनइन्स्टॉल करुन याचा संपूर्ण तपशील त्याने ट्विटरवर दिला होता. यावर झोमॅटोने “अन्नाचा कोणताही धर्म नसतो, अन्न हाच स्वतः एक धर्म आहे” असा शब्दांत या ग्राहकाला सडेतोड उत्तर दिले होते. तसेच झोमॅटोचे मालक दिपिंदर गोयल यांनी म्हटले होते की, असे ग्राहक जर आम्हाला सोडून जात असतील तर त्यांनी खुशाल जावे.