महिंद्रा समूहाचे संचालक आनंद महिंद्रा आपल्या हटके ट्वीट्समुळे नेहमीच चर्चेत असतात. क्रीडा, अर्थकारण, राजकारण ते जागतिक विषयांवर आनंद महिंद्रा ट्वीट्स करतात. अनेकदा आपल्या ट्वीट्समध्ये मिश्किल असणारे आनंद महिंद्रा बऱ्याच वेळी गंभीर भाषेमध्ये देखील सरकारला, राजकीय पक्षांना किंवा इतर देशांना सुनावतात. शुक्रवारी सकाळी त्यांनी केलेलं एक ट्वीट अशाच प्रकारचं होतं. या ट्वीटमध्ये त्यांनी जागतिक पातळीवर सर्वच देशांना कानपिचक्या देत सुनावले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी जगानं पुन्हा एकदा त्याच एका चुकीची पुनरावृत्ती केल्याचा उल्लेख केला आहे. या ट्वीटसोबत त्यांनी जागतिक माध्यमांमध्ये प्रकाशित झालेल्या काही बातम्यांचे स्क्रीनशॉट देखील शेअर केले आहेत.

दुसऱ्यांदा तीच चूक…

आनंद महिंद्रा यांनी करोनासंदर्भात हे ट्वीट केलं असून Delta Variant विषयी त्यांनी सर्वच देशांनी एक चूक दोन वेळा केल्याचा उल्लेख केला आहे. “जेव्हा भारत करोनाच्या डेल्टा व्हेरिएंटशी लढा देत होता, तेव्हा जगानं तीच चूक पुन्हा केली जी कोविड-१९ चा पहिल्यांदा वुहानमध्ये उद्रेक झाला तेव्हा केली होती. जगानं सहानुभूती दाखवली होती. पण हे गृहीत धरलं की ही समस्या स्थानिक स्वरूपाची आहे…दोन वेळा चूक…”, असं आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

ट्वीटसोबत जगभरातील वृत्तांचे स्क्रीनशॉट!

या ट्वीटसोबत आनंद महिंद्रा यांनी न्यूयॉर्क टाईम्सच्या एका ट्वीटचा स्क्रीनशॉट, एनडीटीव्हीच्या एका ट्वीटचा स्क्रीनशॉट आणि एका बातमीचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे.

 

यात न्यूयॉर्क टाईम्सच्या ट्वीटमध्ये ओरॅगनने एका हॉस्पिटलमध्ये मोठ्या संख्येने येणाऱ्या डेल्टा व्हेरिएंटच्या रुग्णांच्या व्यवस्थापनासाठी ५०० जवान पाठवण्याचा निर्णय घेतल्याचं दिसत आहे. एनडीटीव्हीच्या ट्वीटमध्ये इस्रायलमध्ये मोठ्या संख्येनं डेल्टा व्हेरिएंटच्या रुग्णांमुळे देशात चौथा लॉकडाउन लागू करण्याची तयारी सुरू असल्याचं म्हटलं आहे. तर तिसऱ्या ट्वीटच्या स्क्रीनशॉटमध्ये अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये अचानक मोठ्या संख्येने वाढू लागलेल्या डेल्टा व्हेरिएंटच्या रुग्णांविषयीचं वृत्त देण्यात आलं आहे.

आनंद महिंद्रांनी केलेलं ‘हे’ ट्वीटही चर्चेत!

आनंद महिंद्रा यांनी नुकताच केलेला एका महिलेचा फोटो बराच चर्चेत राहिला आहे. या फोटोत एक महिला न्यूयॉर्कमधील सेंट्रल पार्कमधून चालत आहे. तिचा चेहरा फ्रेममध्ये दिसत नाहीये. तिने फॉर्मल कपडे घातलेले आहेत.

 

आनंद महिंद्रांनी शेअर केला अमेरिकेतील महिलेचा फोटो; नेटिझन्स म्हणतायत ‘ती पक्की भारतीय असणार’

यात इंटरेस्टिंग म्हणजे तिने हातात स्टीलचा टिफिन बॉक्स म्हणजेच डब्बा घेतलेला आहे. भारतात सगळीकडे स्टीलच्या डब्ब्याचा वापर केला जातो. परदेशात अशा पद्धतीने स्टीलचा डब्बा घेऊन जाताना कोणी दिसत नाही. त्यामुळे न्यूयॉर्कमधील महिलेला हातात स्टीलचा डब्बा घेऊन जाताना पाहून नेटकऱ्यांनी देखील महिंद्रांच्या ट्विटवर मजेशीर कॉमेंट्स केल्या आहेत