दिल्लीत आम आदमी पक्षाची सत्ता स्थापन होण्यासाठी अरविंद केजरीवाल यांना सातत्याने पाठिंबा दर्शवणारे दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग हेच आता ‘आप’च्या दृष्टीने खलनायक बनले आहेत. जनलोकपाल विधेयकाचा मसुदा आम आदमी पक्षाने नायब राज्यपालांकडे अभिप्रायार्थ पाठवला होता. त्यावर राज्यपालांनी सॉलिसिटर जनरल मोहन पराशरन यांचा सल्ला मागितला. त्यावर पराशरन यांनी दिलेला अभिप्राय थेट प्रसारमाध्यमांकडे गेला. त्यामुळे संतप्त झालेल्या ‘आप’चे प्रवक्ते आशुतोष यांनी थेट जंग यांच्यावरच शरसंधान साधले. त्यामुळे राज्यपाल आणि आप अशी नवी ‘जंग’ दिल्लीत छेडली जाण्याची शक्यता आहे.
जनलोकपाल विधेयकाचा मसुदा केजरीवाल सरकारने जंग यांच्याकडे पाठवला होता. त्यावर सल्ला घेण्यासाठी जंग यांनी सॉलिसिटर जनरलना पाचारण केले. मात्र, यासंदर्भात झालेला पत्रव्यवहार प्रसारमाध्यमांकडे उघड झाला. त्यामुळेच संतप्त झालेल्या आशुतोष यांनी जंग यांना काँग्रेसचा हस्तक असल्याची ट्विप्पणी केली. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही राज्यपालांवर टीका करत त्यांना खरमरीत पत्र लिहिले आहे.
आमच्या सरकारने सायंकाळी विधेयक पाठवले. त्यानंतर आपण सॉलिसिटर जनरलचा सल्ला कधी मागितला आणि नेमका कोणता मसुदा पाहिला याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करत केजरीवाल यांनी राज्यपालांचीच आता परीक्षा असल्याचे स्पष्ट केले. काँग्रेसकडून तुमच्यावर दबाव असून या साऱ्यापेक्षा राज्यघटनेशी तुमची बांधिलकी महत्त्वाची असल्याचेही केजरीवाल यांनी पत्रात म्हटले आहे.