RCB Officials To Be Arrested, Says CM Siddaramaiah: बंगळुरूतील चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियम बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी कर्नाटक सरकारने शहर पोलीस आयुक्त बी दयानंद यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. राज्य सरकारने या दुःखद घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेशही दिले आहेत, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री के सिद्धरामय्या यांनी सांगितले. चेंगराचेंगरीच्या घटनेबद्दल आरसीबी अधिकाऱ्यांना अटक केली जाईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

दरम्यान बंगळुरू पोलिसांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन आणि इव्हेंट मॅनेजमेंट फर्म डीएनए विरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चेंगराचेंगरीबाबत स्थिती अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाने सरकारला या दुःखद घटनेमागील कारणे, ती रोखता आली असती का? आणि भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी कोणते उपाय करता येतील हे स्पष्ट करण्यास सांगितले आहे.

मंगळवारी आयपीएलचे पहिले विजेतेपद मिळवल्यानंतर बुधवारी सकाळी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ व्यवस्थापनाने कर्नाटक विधानसभा ते एम. चिन्नास्वामी स्टेडियमपर्यंत खुल्या बसने विजयी मिरवणूक काढण्याची घोषणा केली होती. पण, बंगळुरू वाहतूक पोलिसांनी वाहतूक कोंडीमुळे विजयी मिरवणूक काढण्याची परवणगी नाकारली होती.

आरसीबी संघ कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना भेटण्यासाठी नियोजित वेळेत विमानतळावर पोहोचला, तर दुसरीकडे चिन्नास्वामी स्टेडियमभोवती एक लाखांहून अधिक चाहत्यांची गर्दी जमा झाली. स्टेडियमचा गेट ३ अंशतः उघडला तेव्हा तिकीटधारक आणि तिकीट नसलेल्या दोघांनीही परिसरात गर्दी करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे प्रचंड गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला.

कर्नाटक सरकारने गुरुवारी एम चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीच्या चौकशीसाठी एक सदस्यीय न्यायिक आयोग स्थापन केला. याचबरोबर या दुर्घटनेला कारणीभूत ठरलेल्या चुकांसाठी बंगळुरू शहराचे पोलीस आयुक्त बी दयानंद यांच्यासह अनेक पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केले करण्यात आले आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री के. सिद्धरामय्या यांनी दिलेल्या माहितीनुसार चेंगराचेंगरीप्रकरणी आरसीबी अधिकाऱ्यांना अटक केली जाणार असली तरी, आता या प्रकरणी राजकीय आरोप-प्रत्यारोप होण्यास सुरुवात झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीसाठी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना जबाबदार धरत केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी गुरुवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शिवकुमार यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी केली आहे.