लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. भाजपाने नुकतंच १६ राज्यातून १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत मध्य प्रदेशमधील भोपाळच्या विद्यमान खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांचा समावेश नाही. त्यांच्याऐवजी भाजपाने भोपाळचे माजी महापौर आलोक शर्मा यांना तिकीट दिलंय. यावरच प्रज्ञासिंह ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली. मी याआधी केलेली काही विधाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवडलेली नाहीत. त्यामुळेच मला तिकीट नाकारण्यात आलं असावं, अशी शक्यता ठाकूर यांनी व्यक्त केली.
३३ विद्यमान खासदारांना तिकीट नाकारलं
भाजपाने आपल्या पहिल्या यादीत एकूण १९५ उमेदवारांची घोषणा केली आहे. यापैकी भाजपाने ३३ नव्या नेत्यांना संधी दिलीय. म्हणजेच भाजपाने एकूण ३३ विद्यमान खासदारांना तिकीट नाकारलंय. यामध्ये प्रज्ञासिंह ठाकूर यांचाही समावेश आहे. ठाकूर या २०१९ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आहेत.
प्रज्ञासिंह ठाकूर नेमकं काय म्हणाल्या?
इंडिया टुडे या इंग्रजी वृत्ताविहीनिशी बोलताना प्रज्ञासिंह ठाकूर म्हणाल्या की, मी याआधीही भाजपाकडे तिकिटाची मागणी केली नव्हती. आतादेखील मी पक्षाकडे तिकीट मागणार नाही. मी याआधी केलेल्या विधानात जे शब्द वापरले होते ते कदाचित नरेंद्र मोदी यांना आवडले नसावेत. मोदी यांनीदेखील ते मला माफ करू शकणार नाहीत, असं सांगितलं होतं. मी केलेल्या विधानानंतर माफीदेखील मागितली होती. मात्र त्यामुळेच मला तिकीट नाकारण्यात आलं असावं.
प्रज्ञासिंह ठाकूर काय म्हणाल्या?
प्रज्ञासिंह ठाकूर यांनी २०१९ साली महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचा उल्लेख खरा देशभक्त म्हणून केला होता. त्यावर मोदींनी नाराजी व्यक्त केली होती. “महात्मा गांधी यांचा अवमान केल्यामुळे मी प्रज्ञासिंह ठाकूर यांना माफ करू शकणार नाही,” असं तेव्हा मोदी म्हणाले होते.
“पक्षाला माझी जेव्हा गरज असेल तेव्हा मी उपस्थित राहीन”
दरम्यान, प्रज्ञासिंह ठाकूर यांनी मी भाजपातच राहणार असल्याचं स्पष्ट केलंय. पक्षाला जेव्हा गरज असेल तेव्हा मी उपस्थित राहीन. पक्ष मला जी जबाबदारी देईल, ती मी पूर्ण करेन, असं प्रज्ञासिंह ठाकूर यांनी सांगितलं.