Viral Video : कॉफीचा एक्स्ट्रा कप दिला नाही म्हणून कॉफी शॉपच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मारहाणीचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एक माणूस कॉफी सेंटरमधल्या कर्मचाऱ्याला मारहाण करत असल्याचं या व्हिडीओत दिसतं आहे. आता पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरु केला आहे.
कुठे घडली आहे ही घटना?
ही घटना बंगळुरुतील शेषाद्रिपुरम मधल्या नम्मा कॉफी सेंटरमधली आहे. संध्याकाळी साधारण ६ वाजून ५० मिनिटांच्या सुमारास कॉफी घेतल्यानंतर एका ग्राहकांच्या समूहाने कॉफी घेतली एक्स्ट्रा कप मागितला. मात्र एक्स्ट्रा कप मिळणार नाही असं कॉफी सेंटरच्या कर्मचाऱ्याने सांगितलं. ज्यानंतर या ग्राहकांनी कर्मचाऱ्याला मारहाण करायला सुरुवात केली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
पोलिसांनी या घटनेबाबत काय माहिती दिली?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कॉफी सेंटरच्या या कर्मचाऱ्याच्या डोक्यावर वार करण्यात आला. तसंच या कर्मचाऱ्याच्या चेहऱ्यालाही दुखापत झाली आहे. त्याच्या पोटातही ठोसे लगावण्यात आले. या घटनेनंतर शेषाद्रिपुरम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलीस या हल्लेखोरांचा तपास करत आहेत. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
“पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कॉफी सेंटरच्या या कर्मचाऱ्याच्या डोक्यावर वार करण्यात आला. तसंच या कर्मचाऱ्याच्या चेहऱ्यालाही दुखापत झाली आहे. त्याच्या पोटातही ठोसे लगावण्यात आले.”
प्रत्यक्षदर्शींनी या घटनेची नेमकी काय माहिती दिली?
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार चार जण या कॉफी शॉपमध्ये आले होते. त्यांनी कॉफी घेतली आणि एक कप एक्स्ट्रा मागितला. तो कर्मचाऱ्याने दिला नाही म्हणून त्याला आधी शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांच्यापैकी एकाने या कर्मचाऱ्याला पाठीमागून फटका दिला. मग इतरही या हल्ल्यात सहभागी झाले आणि या कर्मचाऱ्याला जबर मारहाण केली. कॉफी सेंटरमध्ये उपस्थित असलेल्या इतर लोकांनी कर्मचाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा या लोकांनी त्याला आणखीच मारहाण करायला सुरुवात केली. ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे तसंच या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.