सीबीआयने राजधानी दिल्लीमध्ये मोठी कारवाई केली आहे. येथे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरासहित २१ ठिकाणी छापेमारी केली आहे. आज सकाळीच सीबीआयने ही कारवाई केली असून सिसोदिया यांच्या निवासस्थानी सीबीआयचे अधिकारी तसेच पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, मनीष सिसोदिया तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट करत या काराईचा निषेध केला आहे. दिल्लीमधील उत्पादन शुल्क धोरणातील कथित अनियमिततेच्या संदर्भात ही छापेमारी करण्यात येत आहे.

“सीबीआय आलेली असून त्यांचे स्वागत आहे. आम्ही ईमानदार आहोत. लाखो मुलांच्या भविष्य उभारणीचे काम आम्ही करत आहोत. जो चांगले काम करतो त्याला असाच त्रास दिला जातो. आपल्या देशाचे हे दुर्देव आहे. याच कारणामुळे आपल देश प्रथम क्रमांकावर नाही,” असे ट्वीट करत मनीष सिसोदिया यांनी या कारवाईचा निषेध केला आहे.

तसेच, “सत्य लवकर समोर यावे म्हणून आम्ही सीबीआयला पूर्ण सहकार्य करू. माझ्यावर आतापर्यंत अनेक गुन्हे दाखल करण्यात आले मात्र त्यातून काहीही निष्पन्न झालेले नाही. या कारवाईतूनही काहीही समोर येणार नाही. चांगले शिक्षण देण्याच्या आमच्या प्रयत्नांना कोणीही रोखू शकत नाही,” असेदेखील सिसोदिया म्हणाले.

…म्हणूनच आरोग्य आणि शिक्षणमंत्र्यांच्या घरावर छापेमारी- अरविंद केजरीवाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिसोदिया यांच्याविरोधातील या कारवाईवर अरविंद केजरीवाल यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. “दिल्लीमधील शिक्षण आणि आरोग्य सवेवर होत असलेल्या कामाची दखल जगभरात घेतली जात आहे. या कामाला यांना थांबवायचे आहे. याच कारणामुळे आरोग्य आणि शिक्षणमंत्र्यांच्या घरावर छापेमारी करण्यात येत आहे. ७५ वर्षातील सर्व चांगल्या कामांना थांबवण्याचे काम करण्यात येत आहे. याच कारणामुळे भारत पिछाडीवर आहे,” अशी टीका केजरीवाल यांनी केली आहे.