लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: ‘इंडिया’ आघाडीतील जागावाटपाने पुन्हा वेग घेतला असून उत्तर प्रदेशमध्येही काँग्रेस व समाजवादी काँग्रेस या दोन्ही घटक पक्षांनी जागावाटपांवर बुधवारी शिक्कामोर्तब केले. या शिवाय, बिहार, तामीळनाडू, दिल्ली या राज्यांमध्येही जागावाटपांवर चर्चा केली जात आहे.

नव्या सूत्रानुसार ८० जागांपैकी ‘सप’ ६२ तर, काँग्रेस १७ जागा लढवू शकेल. एक जागा चंद्रशेखर आझाद यांच्या ‘आझाद समाज पक्षा’ला दिली जाईल. मुरादाबाद मतदारसंघाचा आग्रह काँग्रेसने तर, वाराणसीचा आग्रह ‘सप’ने सोडून दिला आहे. रायबरेली, अमेठी, वाराणसी, कानपूर, मथुरा, झांसी आदी जागा काँग्रेस लढवणार आहे.

हेही वाचा >>> Rajyasabha Election : काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या मिलिंद देवरा आणि अशोक चव्हाणांची राज्यसभेवर बिनविरोध निवड

दिल्लीतील ७ जागांसाठी ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल व काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यामध्ये चर्चा झाली होती. दिल्लीत तरी भाजपविरोधात एकत्र येणाचा निर्णय घेण्यात आला होता. काँग्रेसने ४ जागांची मागणी केल्यामुळे बुधवारी जागावाटपांच्या वाटाघाटींमध्ये अडथळा निर्माण झाला. मात्र, दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या स्तरावर सामंजस्य घडवून आणले जाण्याची शक्यता आहे. पंजाबमध्ये भाजपचे अस्तित्व नगण्य असल्यामुळे ‘आप’ व काँग्रेसने युती न करता सर्वच्या सर्व १३ जागांवर स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. बिहारमध्ये नितीशकुमार ‘इंडिया’तून बाहेर पडल्यामुळे महाआघाडीतील राष्ट्रीय जनता दल व काँग्रेसमध्ये जागावाटपाच्या नव्या सूत्रांवर चर्चा केली जात आहे. बिहारमधील ४० जागांपैकी २७-२८ जागा राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस ७-८ जागा व डाव्या पक्षांना ४ जाग दिल्या जाऊ शकतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तामिळनाडूमध्ये ३९ जागांपैकी सत्ताधारी ‘द्रमुक’ने काँग्रेसला ७ जागा देऊ केल्या असल्या तरी काँग्रेसने १६ जागांची मागणी केली आहे. राहुल गांधी वा सोनिया गांधी यांनी ‘द्रमुक’चे प्रमुख स्टॅलिन यांच्याशी संवाद साधला तर काँग्रेसला सातपेक्षा जास्त जागा दिल्या जाऊ शकतात. द्रमुक-काँग्रेस आघाडीमध्ये कमल हासन हे देखील सहभागी होण्याची शक्यता असून त्यांना लोकसभा निवडणुकीत उतरवले जाऊ शकते वा राज्यसभेचे सदस्यही दिले जाऊ शकते. प.बंगालमध्ये ४२ जागांपैकी तृणमूल काँग्रेसने काँग्रेसला फक्त दोन जागा दिल्या असल्यामुळे इथे दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपांबाबत तडजोड होण्याची शक्यता नाही.

प्रियंकांची यशस्वी शिष्टाई

काँग्रेसने अपेक्षेपेक्षा जास्त जागांची मागणी केल्यामुळे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी जागावाटपाची चर्चा बासनात गुंडाळून ठेवली होती. मात्र, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा यांच्या मध्यस्थीनंतर बुधवारी दोन्ही पक्षांमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते.