या आठवड्याच्या सुरुवातीला बंगालच्या उपसागरात ‘असनी चक्रीवादळ’ निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. हिंदी महासागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे हे चक्रीवादळ निर्माण झाले आहे. परिणामी आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर जोरदार वारे आणि पाऊस पडण्यास सुरुवात झाली होती. आता हे असनी चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात दाखल झाले आहे. त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना सावध राहण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.


अंदमान आणि निकोबार बेटांकडे वादळ सरकण्याचा अंदाज
‘असनी’ चक्रीवादळ अंदमान द्वीपसमूहच्या पश्चिमेला सुमारे ३८० किलोमीटर वायव्येकडे सरकत असल्यामुळे पुढील २४ तासांत पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात त्याचे तीव्र चक्रीवादळात रुपांतर होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. गेल्या मंगळवारी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता. शनिवारपर्यंत ते पूर्व-वायव्य दिशेने सरकण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. यानंतर हे वादळ अंदमान आणि निकोबार बेटांकडे सरकण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अंदमान-निकोबार बेटांवर प्रवास न करण्याचा सल्ला
या चक्री वादळाला श्रीलंकेने ‘असनी’ नाव दिले आहे. उत्तर आणि उत्तर-पूर्व दिशांना प्रभाव दाखवल्यानंतर हे चक्रीवादळ बांगलादेश आणि म्यानमारच्या उत्तरेकडील टोकापर्यंत पोहोचले आहे. हवामान खात्यानुसार आग्नेय बंगालचा उपसागर व दक्षिण अंदमान समुद्रात वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने या भागातील मच्छिमारांना मासेमारीसाठी न जाण्याचा इशारा दिला. तसेच अंदमान-निकोबार बेटांवर प्रवास न करण्याचा सल्लाही दिला आहे.