scorecardresearch

रेल्वे स्थानकांवर दोन रुपयांत शुद्ध पाणी मिळणं कठीण?

पश्चिम रेल्वेच्या २३ स्थानकांवर ‘या’ कारणामुळे ही सुविधा बंद केली गेली आहे.

रेल्वे स्थानकांवर दोन रुपयांत शुद्ध पाणी मिळणं कठीण?
संग्रहीत

भारतीय रेल्वे स्थानकांवर कदाचित यापुढे प्रवाशांना दोन रुपयांमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार नाही. कारण, रेल्वे प्रशासनाकडून ही सुविधा बंद देखील केली जाण्याची शक्यता आहे. सध्या रेल्वेस्थानकांवर २ रुपयांमध्ये ३०० मिलिलीटर पिण्याचे पाणी दिले जाते. मात्र, ही सुविधा प्रवाशांना जरी फायदेशीर असली तरी ठेकेदारांना महागात पडत असल्याचे सांगितले जात आहे. आयआरसीटीसीने अशाताच पश्चिम रेल्वेच्या २३ स्थानकांवर ही सुविधा बंद केली आहे. याबाबत शुक्रवारी आयआरसीटीकडून पत्राद्वारे माहिती देण्यात आली.

ही सुविधा देणाऱ्या कंपनीने वीज व पाण्याचे बिल आतापर्यंत भरले नसल्याची माहिती समोर आली आहे. हे बिल रेल्वेकडून कंपनीस देण्यात आले आहे. एवढेच नाहीतर पाण्यासंदर्भात आलेल्या तक्रारींवरून आयआरसीटीने आतापर्यंत ठोठवलेल्या दंडाची रक्कम देखील कंपनीकडे थकीत असल्याचेही समोर आले आहे.

कंपनीचे हे धोरण पाहता आयआरसीटीकडून रेल्वे विभागास कळवण्यात आले आहे की, जोपर्यंत कंपनी बिलाची थकीत रक्कम भरत नाही, तोपर्यंत त्यांच्या कोणत्याही मशीन त्यांना घेऊन जाण्याची परवानगी देऊ नये. हे पाहता असे स्पष्ट होते की, जो पर्यंत संबंधित कंपनीकडून थकीत रक्कम भरली जात नाही, तोपर्यंत पश्चिम रेल्वेच्या स्थानकांवर स्वस्त दरात पाणी मिळणे सुरू होणार नाही. मात्र, अन्य कंपनींकडून दिली जाणारी ही सुविधा पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार असल्याचे सांगितले जात आहे.
किरकोळ दरात शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने २०१५ मध्ये वॉर वेंडिंग मशीन लावण्याची योजना सुरू करण्यात आली होती. या मशीनद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी दिल्या जात आहे. या मशीनद्वारे मिळणारे पाणी हे बाटलीबंद पाण्यापेक्षाही शुद्ध असल्याचा दावा करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या