Parliament Security Breach : संसदेची सुरक्षा भेदून लोकसभेचं कामकाज सुरू असताना राडा करणारे, सभागृहात धूर पसरवणारे दोन तरुण पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची चौकशी चालू आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. ज्यामध्ये संसदेत घडलेल्या सर्व गोष्टींचा घटनाक्रम तसेच या तरुणांनी तिथे घुसण्यापूर्वी केलेल्या तयारीची सविस्तर माहिती नमूद करण्यात आली आहे. सभागृहात राडा करणारे सागर शर्मा (२५) आणि डी. मनोरंजन (३५) या दोघांनी स्मोक कॅन लपवण्यासाठी बूटांचे सोल कापून कप्पा तयार केला होता. बुटांच्या टाचेजवळ कप्पा तयार केला होती. त्यांच्याकडे हिंदी आणि इंग्रजी भाषेतली पत्रकं देखील होती. ही पत्रकं मणिपूरमधील सध्याच्या परिस्थितीशी संबंधित होती.

१३ डिसेंबर रोजी लोकसभेचं कामकाज सुरू असताना सागर आणि मनोरंजन या दोघांनी सभागृहाच्या वर असलेल्या प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उड्या मारल्या. दोघेही सुरक्षा व्यवस्था भेदून सभागृहात आले आणि खासदारांच्या बाकांवरून उड्या मारत लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीच्या दिशेने धावू लागले होते. त्यावेळी या दोघांना पकडण्यासाठी काही खासदार पुढे सरसावले. त्यांनी या दोघांना घेरलं. त्यानंतर दोघांनी त्यांच्या बुटातून स्मोक कॅन काढले आणि संसदेत पिवळा धूर पसरवला. हा प्रकार पाहून अनेक खासदार सभागृहातून बाहेर पडले, तर काही खासदारांनी या दोघांना पकडून चोप दिला.

पोलिसांनी सागर आणि मनोरंजनकडील आधार कार्ड, त्यांचे बूट, यलो स्मोक कॅन, लोकसभा पब्लिक गॅलरीचे पास जप्त केले आहेत. पोलीस एफआयआरमध्ये म्हटलं आहे की, सागर शर्मा याने राखाडी रंगाचे बूट परिधान केले होते. डाव्या पायाच्या बुटाच्या टाचेजवळचा भाग कापून तिथे एक कप्पा तयार केला होता. तसेच बुटाला अतिरिक्त सोल जोडला होता, ज्यामुळे बूट थोडे मोठे झाले होते. अशाच प्रकारे डी. मनोरंजन यानेही त्याच्या डाव्या पायाच्या बुटाच्या सोलमध्ये स्मोक कॅनसाठी कप्पा तयार केला होता. मनोरंजन याने दोन्ही बूटांना नवीन सोल जोडला होता. दोघांकडे क्रिएटिव्ह कलर स्मोकचे दोन-दोन कॅन होते, जे पोलिसांनी जप्त केले आहेत.

हे ही वाचा >> Parliament security breach : कुणी महात्मा गांधींच्या विरोधात, कुणी कृष्णभक्त काय सांगतात आरोपींचे सोशल मीडिया प्रोफाईल?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यांच्याकडे असणाऱ्या पत्रकांवर ‘जय हिंद’ लिहिलं होतं, तसेच त्यावर भारतीय राष्ट्रध्वजाचा फोटोही होता. तसेच मणिपूरसंदर्भातल्या घोषणा छापल्या होत्या. दोघांकडे एकूण चार स्मोक कॅन होते, त्यापैकी तीन कॅन्सचा त्यांनी वापर केला. या कॅन्सवर लिहिलं आहे की, हे वापरताना चष्मा आणि हातमोजे परिधान करायला हवेत. बंद खोल्यांमध्ये याचा वापर करू नये. हे चिनी बनावटीचे कॅन आहेत.