काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. पक्षाचं प्राथमिक सदस्यत्वही त्यांनी सोडलं आहे. १६ ऑगस्टला त्यांनी जम्मू काश्मीर काँग्रेस प्रचार समितीच्या प्रमुखपदाचा राजीनामा देत आपल्या नाराजीचे संकेत दिले होते. त्यानंतर अखेर आता त्यांनी राजीनामा देत पक्षाला मोठा धक्का दिला आहे. गुलाम नबी आझाद यांनी अध्यक्षा सोनिया गांधी यांना चार पानांचं पत्र पाठवत राजीनामा देत असल्याचं सांगितलं आहे.
५ आमदारांसह माजी मंत्र्यांचाही राजीनामा
दरम्यान गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. जम्मू-काश्मीरमधील काँग्रेसच्या ५ आमदारांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. याशिवाय जम्मू-काश्मीर काँग्रेसच्या दोन नेत्यांनीही आझाद यांच्या समर्थनार्थ राजीनामा दिला आहे. अशाप्रकारे जम्मू-काश्मीरमधील काँग्रेसच्या एकूण सात नेत्यांनी आझाद यांच्या समर्थनार्थ पक्ष सोडला आहे. राजीनामा देणाऱ्यांमध्ये माजी काँग्रेस मंत्री आरएस चिब आणि जीएम सरूरी, माजी आमदार मोहम्मद अमीन भट, माजी आमदार नरेश गुप्ता आणि पक्षाचे नेते सलमान निजामी यांचा सामावेश आहे. आझाद यांनी नवीन पक्ष स्थापन केला तर त्यांच्यासोबत जाणार, अशी भूमिका माजी आमदारांनी व्यक्त केली आहे.
आझाद नवीन पक्ष स्थापन करणार
गुलाम नबी आझाद यांनी राजीनामा दिल्यानंतर ते भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. पण या सर्व चर्चांना गुलाम नबी आझाद यांनी तूर्तास पूर्णविराम दिला आहे. आपण जम्मू काश्मीरमध्ये स्वत:चा राजकीय पक्ष काढणार असल्याचं आझाद यांनी जाहीर केलं आहे. याबाबतचं वृत इंडिया टुडेनं दिलं आहे.