बिपीन देशपांडे

शंभर कुटुंबांचा जगण्याचा आधार

आकार देण्यासाठी हाती येणारा झेंडा कोणत्याही रंगांचा असो. हे झेंडेच आमच्या कुटुंबाच्या जगण्याचा आधार. कापडाला आकार द्यावा तसा या झेंडय़ांमुळे जगण्यालाही एक दिशा मिळाली. झेंडा बनवण्याचे काम हाताला मिळाले आणि त्यातला विशिष्ट घटकवर्ग दर्शवणारा रंग मनातून गळून पडला. त्याविषयी मनात कोणतीही भावना जागी होत नाही. हा झेंडा संसाराला हातभार लावतो, हेच आम्हाला ठाऊक, असे रुपाली ब्राह्मणे आणि कुसुम सपकाळ सांगत होत्या. त्यांच्यासारखेच काम करणाऱ्या शेख समीना यांच्याही त्याच भावना.

औरंगाबादेत झेंडे तयार करणाच्या कामात जवळपास शंभर एक कुटुंबे गुंतली आहेत. वर्षभर हेच काम कुटुंबातील महिलांच्या हाती. या कुटुंबात रामनवमीसह महापुरुषांची जयंती, उत्सवासाठी भगवा, निळा, पिवळा किंवा अन्य रंगांच्या कापडातून तयार केलेले झेंडे आणि इतर वस्तू ढिगांनी पडलेल्या. वेगवेगळ्या रंगांच्या कपडय़ांना झेंडय़ांचा आकार दिला की त्याचा बऱ्यापैकी मोबदला हाती पडतो आणि त्यावरच बराचसा संसार चालतो.

रुपाली ब्राह्मणे यांचे चौकोनी कुटुंब. पती, दोन मुले आणि त्या. रुपाली सांगत होत्या, ‘औरंगाबादेत एकटय़ाच्या कमाईवर घर चालवणे तसे अवघड. मुला-बाळांच्या शिक्षणाचा खर्च वेगळा. त्यामुळे मीही घर चालवण्यासाठी कामाचा विचार करीत होते. ठोक झेंडे पुरवणारे गणेश काथार यांच्याकडे काम मिळाले.

काथार यांच्याकडे काम करणाऱ्या माझ्यासारख्या २० ते २५ महिला आहेत. या सर्व महिला समाजातील वेगवेगळ्या घटकातील. महिन्याकाठी ५ ते ७ हजार रुपयांचे काम हातून होते. जवळपास वर्षभर हे काम हाती असते. बाकी काहीही असो पण या झेंडय़ांनीच संसारात आनंद निर्माण केला.’ शेख समीना, कमल सपकाळ यांच्याही अशाच भावना. औरंगाबादेत झेंडे तयार करणारे अन्य काही ठोक व्यावसायिक आहेत. या सर्वाकडे झेंडय़ाच्या कामावर जगणारे जवळपास शंभर एक कुटुंबे आहेत.

कामानुसार मोबदला

कापडानुसार, लेस लावलेला, पट्टी जोडलेला झेंडा. साधी शिलाई, असे झेंडय़ांचे वेगवेगळ्या प्रकारात मोडणारे काम असते. नगानुसार त्याची रोजंदारी दिली जाते. साध्या झेंडय़ांचा दर १८ ते २० रुपये डझनापर्यंत. जेवढे काम कराल तेवढे त्या महिलेला पैसे अधिक मिळतात. चार ते पाच-सात हजारांपर्यंत महिलांच्या हाती पडतात, असे व्यावसायिक गणेश काथार यांनी सांगितले.