संयुक्त राष्ट्रे : ‘आता युद्ध करण्याचा काळ नाही,’ हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशियाच्या अध्यक्षांना दिलेला सल्ला योग्यच आहे, असे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी म्हटले. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेमध्ये युद्धविरोधी भूमिका मांडताना त्यांनी नुकत्याच झालेल्या मोदी-पुतिन भेटीचा संदर्भ दिला.

गेल्या आठवडय़ात शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेवेळी मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट झाली होती. यावेळी मोदींनी पुतिन यांना हा सल्ला दिला होता. त्याचा संदर्भ देताना ‘‘पश्चिम विरुद्ध पूर्व वादाची ही वेळ नाही. सर्व स्वायत्त राष्ट्रांनी एकत्र येऊन आव्हानांचा मुकाबला करण्याचा हा काळ आहे. या युद्धात तटस्थ भूमिका घेणे ही ऐतिहासिक चूक ठरले. तटस्थ राष्ट्रांचा लढा हा शांततेसाठी असला पाहिजे. त्यांनी शांत राहणे हे नव्या साम्राज्यवादाला एका अर्थी मदत करणारे ठरेल,’’ असे मॅक्रॉन म्हणाले.

संयुक्त राष्ट्रांच्या ७७व्या महासभेच्या पहिल्याच दिवशी रशिया-युक्रेनसह जागतिक समस्यांचे प्रतिबिंब उमटले. संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटेनिओ गुटेरेस यांनी याबाबत चिंता व्यक्त केली. सहा महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध, इस्रायल-पॅलेस्टाईनमधील वाद, वातावरण बदल, इंधनाचे वाढते दर, अन्नधान्य टंचाई, आर्थिक तफावत, स्थलांतरितांच्या समस्या, सार्वजनिक आरोग्य हे सर्वाधिक काळजीचे विषय असल्याचे ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताच्या भूमिकेचे समर्थन संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची रचना बदलण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा मॅक्रॉन यांनी व्यक्त केली. परिषदेतील कायम सदस्यांची संख्या वाढवणे, नकाराधिकार काढून टाकण्यासारख्या सुधारणा गरजेच्या असल्याचे ते म्हणाले. भारत सुरक्षा परिषदेतील सुधारणेबाबत सातत्याने मागणी करत आला आहे.