नवी दिल्ली : ‘नॅशनल हेराल्ड’ वृत्तपत्र आणि त्याच्या संबंधित कंपन्यांच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ७५२ कोटींची मालमत्ता जप्त केल्यानंतर भाजपने बुधवारी काँग्रेसला फटकारले. गांधी घराण्याला त्यांच्या पापांची किंमत मोजावी लागेल, अशी टीका भाजपने केली.
माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी गांधी कुटुंबावर नॅशनल हेराल्डच्या संपत्तीवर कब्जा केल्याचा आरोप केला. गांधी कुटुंबाने बंद पडलेल्या या वृत्तपत्राच्या मालमत्तेचे त्यांच्या वैयक्तिक मालमत्तेत रूपांतर केले, असे रविशंकर म्हणाले. पत्रकार परिषदेला संबोधित करताना प्रसाद म्हणाले, ईडीने केलेली कारवाई अप्रामाणिकपणा आणि सार्वजनिक मालमत्तेची लूट याविरोधात आहे. मात्र या कारवाईचे वर्णन काँग्रेसने लोकशाहीची गळचेपी असे का केले, हे स्पष्ट करावे.
हेही वाचा >>> दोन कॅप्टन, दोन जवान शहीद; जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत मेजरसह अन्य एक जवान जखमी
‘‘नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राची अनेक शहरांमध्ये मालमत्ता आहे आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि त्यांचे पुत्र राहुल गांधी यांनी या किमती मालमत्तेचे विनियोजन केले. कारण त्यांच्या मालकीच्या फर्मचे शेअर्स एका कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आले, जिथे दोघांचे ७६ टक्के शेअर्स नियंत्रित होते. हे लाजिरवाणे असून लोकशाहीची खरी गळचेपी आहे,’’ असे प्रसाद म्हणाले. गांधी घराण्याने स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करण्याचा काँग्रेसचा वारसाच नव्हे तर पक्षाशी संबंधित मालमत्ताही जोडल्याचा आरोप त्यांनी केला.
राजकारणातील हीन पातळी- कपिल सिबल
अंमलबजावणी संचालनालयाने ‘नॅशनल हेराल्ड’ वृत्तपत्राची मालमत्ता जप्त केल्याबद्दल राज्यसभा खासदार कपिल सिबल यांनी ‘ईडी’वर टीका केली. ही राजकारणातील नवीन हीन पातळी आहे, असे सिबल म्हणाले. तपास यंत्रणा कोणाच्या तरी इशाऱ्यावरून त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला. ‘‘जेव्हा अज्ञानात आनंद असतो, तेव्हा शहाणे होणे मूर्खपणाचे असते. कंपनीचे भागधारक हे कंपनीच्या मालमत्तेचे मालक नसतात. त्यामुळे मालक हेच भागधारक आहेत असे समजून केलेली कारवाई चुकीची आहे’’ असे सिबल म्हणाले.