जागतिक शांतता निर्देशांकात भारताचा १४१ वा क्रमांक लागला आहे. बुरूंडी, सर्बिया व बुर्किना फोसो या देशांपेक्षाही भारतात अशांतता जास्त आहे असा या क्रमवारीचा अर्थ होतो. २०१५ मध्ये हिंसाचारामुळे भारतात ६८० अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले असेही याबाबतच्या पाहणी अहवालात म्हटले आहे.
एकूण १६३ देशांची शांततेच्या मुद्दय़ावर क्रमवारी इन्स्टिटय़ूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस या संस्थेने लावली आहे. त्यात सीरिया पहिल्या क्रमांकावर आहे, त्यानंतर दक्षिण सुदान, इराक, अफगाणिस्तान व सोमालिया यांचे क्रमांक आले आहेत. आइसलँड हा जगातील सर्वात शांततापूर्ण देश ठरला असून त्याखालोखाल डेन्मार्क व ऑस्ट्रिया यांचा समावेश आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत भारत दोन घरे वर सरकला आहे.
देशाचे शांतता गुण हे कमी झाले आहेत त्यामुळे इतरांच्या तुलनेत भारताची कामगिरी खराब झाली आहे. अहवालात म्हटले आहे की, गेल्या दशकभरात भारताची परिस्थिती घसरत गेली आहे. संयुक्त राष्ट्रांनी ठरवून दिलेल्या काही गटात भारताची कामगिरी वाईट आहे. दक्षिण आशियात भूतानची स्थिती चांगली असून त्याचा तेरावा क्रमांक आहे तर पाकिस्तान आशियात सहावा तर एकूणात १५३ वा, भारत आशियात पाचवा तर एकूणात १४१ वा आहे. अफगाणिस्तानही सहाव्या क्रमांकावर असून एकूणात त्याचा क्रमांक १६० वा आहे.
भारतातील देशांतर्गत हिंसाचार, अंतर्गत कलह, लष्करीकरण यामुळे भारताची स्थिती वाईट आहे. देशात दहशतवादाचा धोका पाकिस्तानला सीमा लागून असल्यामुळे आहे. वर्षांत दहशतवादी हल्ल्यातील मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे.
भारताला २०१६ या वर्षांत अर्थव्यवस्थेला ६७९.८० अब्ज डॉलर्स इतका फटका बसला असून हे प्रमाण देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या पाच टक्के असून दरडोई ५२५ डॉलर्सचा फटका बसला आहे.



