Bangladesh : बांगलादेशमध्ये अल्पसंख्याकांविरुद्ध हिंसाचारात दिनाजपूरच्या बिरल उपजिल्हा येथील एका हिंदू नेत्याचं अपहरण करून त्याची क्रूरपणे हत्या करण्यात आली, अशी माहिती स्थानिक पोलीस आणि कुटुंबातील सदस्यांनी दिली आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, भाबेश चंद्र हे त्या भागातील हिंदू समुदायाचे एक प्रमुख नेते होते आणि त्यांनी बांगलादेश पूजा उत्सव परिषदेच्या बिरल युनिटचे उपाध्यक्ष म्हणूनही काम केले होते. बांगलादेशातील आघाडीच्या वृत्तपत्र द डेली स्टारशी बोलताना चंद्रा यांच्या पत्नी शांतना रॉय म्हणाल्या की, गुरुवारी दोन मोटारसायकलींवर चार जण आले आणि त्यांनी भाबेश यांचे त्यांच्या घरातून अपहरण केले. अनेक साक्षीदारांनी असेही सांगितले की त्यांनी हल्लेखोरांना भाबेशला नाराबारी गावात घेऊन जात असल्याचे पाहिले, तिथेच त्यांची क्रूरपणे हत्या करण्यात आल्याचा दावा केला जातोय.
बेशुद्धावस्थेत असलेल्या भाबेश यांना हल्लेखोरांनी व्हॅनमधून घरी सोडलं. त्यामुळे त्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी त्यांना तत्काळ बिरल उपजिल्हा आरोग्य संकुलात नेले. त्यानंतर, त्यांना दिनाजपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात हलविण्यात आले, तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. बिरल पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणाले की, पोलीस या घटनेत सहभागी असलेल्या संशयितांची ओळख पटवून त्यांना अटक करण्याचे काम करत आहेत आणि गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू आहे.
महिन्याभरात अनेक घटना
गेल्या महिन्यात, ढाकास्थित मानवाधिकार संघटना, ऐन ओ सलीश केंद्र (AsK) च्या एका अहवालात असे दिसून आले आहे की बांगलादेशात हिंदू समुदायाची घरे, मंदिरे आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांची तोडफोड करण्याच्या एकूण १४७ घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये सुमारे ४०८ घरांची तोडफोड करण्यात आली, ज्यात ३६ जाळपोळीच्या घटनांचा समावेश आहे. याशिवाय, अल्पसंख्याक समुदायाच्या मालकीच्या व्यावसायिक प्रतिष्ठानांची तोडफोड करण्याच्या ११३ घटना, अहमदिया पंथाच्या मंदिरे आणि मशिदींवर हल्ल्याच्या ३२ घटना आणि ९२ मंदिरांमधील मूर्तींची तोडफोड करण्याच्या ९२ घटना घडल्याचे वृत्त आहे.
सप्टेंबर २०२४ मध्ये, देशातील आघाडीचे बंगाली दैनिक प्रथम आलोने वृत्त दिले की अवामी लीग सरकारच्या पतनानंतर, देशभरात अल्पसंख्याक समुदायांवर, विशेषतः हिंदू समुदायावर हल्ल्यांच्या अनेक घटना घडल्या आहेत. अनेक भागात, हिंदूंची घरे, व्यावसायिक प्रतिष्ठाने आणि प्रार्थनास्थळांवर अजूनही हल्ले होत आहेत.