मध्य प्रदेशमधील राजकीय नाट्य आता चांगलेच रंगात आले आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर आता काँग्रेसचे आमदार देखील काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आहेत. राज्य सरकारमधील सहा मंत्र्यांसह १९ आमदारांनी नुकताच काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंततर आता काँग्रेसचे नेते आमदार बिसाहु लाल साहू यांनी देखील काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला आहे.

मी काँग्रेस व राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मी भाजपात प्रवेश केला आहे. येणाऱ्या काळात काँग्रेसचे अनेक आमदार राजीनामा देणार आहेत. कमलनाथ सरकारच्या कारभाराला ते वैतागले आहेत. अशी प्रतिक्रिया आमदार बिसाहू लाल साहू यांनी माध्यमांसमोर दिली आहे. यावेळी त्यांच्याबरोबर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची देखील उपस्थिती होती.

ज्योतिरादित्य शिंदे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांचे समर्थक असलेल्या काँग्रेसच्या तब्बल १९ आमदारांनी देखील राजीनामे दिले आहेत. विशेष म्हणजे या १९ आमदारांमध्ये कमलनाथ सरकारमधील सहा मंत्र्यांचा देखील समावेश आहे. यामुळे आता मध्य प्रदेशातील काँग्रेसचे सरकार कोसळणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.