Iranian Child slammed on floor by man at Moscow airport Viral Video : रशियाची राजधानी मॉस्को येथील Sheremetyevo आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक अत्यंत भयानक घटना समोर आली आहे. या घटनेत एका पर्यटकाने १८ महिन्याचा मुलाला उचलून जमिनीवर जोरात आपटल्याने ते मूल कोमामध्ये गेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाईट बाब म्हणजे हे मुल त्याच्या गर्भवती आईबरोबर इराणमधील संघर्षापासून वाचण्यासाठी अफगाणीस्तान मार्गे नुकतेच रशियामध्ये पोहचले होते. दरम्यान ही भीषण घटना विमानतळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

दरम्यान मुलाला जमिनीवर आपटणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली असून त्याचे नाव ब्लादिमीर व्हिटकोव्ह (३१) असे सांगितले जात आहे आणि ते बेलारूसचा रहिवासी आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये व्हिटकोव्ह हा सूटकेसच्या जवळ उभ्या असलेल्या मुलाला पकडून फरशीवर जोरात आपटताना दिसत आहे. हे भीषण कृत्य करण्याच्या आधी तो आजूबाजूला पाहताना देखील दिसून येत आहे.

आई अवघ्या काही मीटर अंतरावर होती

या घटनेत मुलाच्या कवटीला फ्रॅक्चर झाले आहे आणि पाठीच्या कण्याला देखील गंभीर इजा झाली आहे. या जखमी अवस्थेत या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा हल्ला करण्यात आला तेव्हा या मुलाची आई अवघ्या काही मीटर अंतरावर होती. ही घटना घडल्यानंतर लगेच जवळपासच्या लोकांनी व्हिटकोव्ह याला रोखले आणि प्रशासनाला याबद्दल माहिती दिली.

रशियन अधिकार्‍यांनी या व्यक्तीविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी तपास सुरू केला आहे. तसेच या कृती मागील नेमके कारण काय होते? याचा देखील शोध घेतला जात आहे. व्हिटकोव्ह याच्या चाचण्यांमध्ये गांजाचा अंश आढळून आला आहे, तसेच त्याच्याकडे काही अंमली पदार्थ देखील आढळून आले आहेत.

अगदी लहान मुलावर असा हल्ला करण्यात आल्याने यावर जगभरातून टीका केली जात आहे. तसेच या घटनेमुळे विमान तळावरील सुरक्षा, मानसिक आरोग्य तपासणी आणि निर्वासित कुटुंबांच्या असुरक्षिततेबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. विशेष बाब म्हणजे मॉस्को येथील ज्या विमानतळावर ही भीषण घटना घडली आहे ते Sheremetyevo विमानतळ सर्वात गजबजलेला विमानतळ आहे, येथे दरवर्षी किमान ४० मिलीयन प्रवासी येतात, याच विमानतळावर घडलेल्या य़ा घटनेचा तपास सुरू आहे.