नवी दिल्ली :  अतिरिक्त सत्र न्यायाधीश उत्तम आनंद यांच्या हत्येप्रकरणी गेल्या महिन्यात विशेष सीबीआय न्यायालयाने लखन वर्मा आणि राहुल वर्मा यांना दोषी ठरवले होते. त्यांना न्यायालयाने शनिवारी जन्मठेप आणि ३० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. आनंद हे सकाळी फेरफटक्यासाठी बाहेर पडले असताना त्यांना मोबाइल चोरीच्या उद्देशाने आरोपींनी रिक्षाची धडक दिली होती.

शवविच्छेदन अहवालापासून सीसीटीव्ही चित्रीकरण, थ्रीडी प्रतिमा आदींच्या माध्यमांतून आरोपींची ओळख पटली होती. त्या आधारे लखन वर्मा आणि राहुल वर्मा यांनी  मोबाइल हिसकावण्यासाठी न्यायाधीशांना रिक्षाची धडक दिली होती, असे स्पष्ट झाले होते. रिक्षाने धडक दिल्यानंतर न्यायाधीशांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ते जमिनीवर पडले, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. ही घटना गेल्या वर्षी जुलैमध्ये घडली होती. दोन्ही आरोपींना कलम ३०२ आणि २०१ अंतर्गत दोषी ठरवण्यात आले होते.