Karnataka Gold Heist Connection with RCB vs SRH Match : कर्नाटक पोलिसांनी कॅनरा बँकेतील एका मोठ्या चोरीचा छडा लावला आहे. या चोरीच्या घटनेत ५३ कोटी रूपये किमतीचे दागिने चोरीला गेले होते. या प्रकरणात पोलिसांनी बँकेच्या शाखा व्यवस्थापकासह दोघांना अटक केली आहे. यामध्ये शाखा व्यवस्थापक विजयकुमार मिरिया (४१), त्याचा सहकारी व एका खासगी कंपनीत काम करणारा चंद्रशेखर नेरेल्ला (३८), सुनील नरसिंहलू मोका (४०) यांचा समावेश आहे.

कर्नाटकमधील विजयपुरा जिल्ह्यातील मनागुली शहरातील कॅनरा बँकेच्या शाखेत २५ मे रोजी ही चोरी झाली होती. यामध्ये ५८.९७ किलो सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. चोरांनी तपास करणाऱ्या पोलिसांची दिशाभूल करण्याचे अनेक प्रयत्न केले खरे, मात्र कर्नाटक पोलिसांनी हे प्रयत्न हाणून पाडले.

अन् चोरांना योजना पुढे ढकलावी लागली

दरम्यान, पोलीस चौकशीत आणखी काही माहिती समोर आली आहे. या चोरांनी २३ मे रोजी चोरीची योजना आखली होती. त्या दिवशी इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळवण्यात आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यात बंगळुरूचा पराभव झाल्यामुळे चोरांना त्यांची योजना पुढे ढकलावी लागली होती.

बंगळुरूच्या पराभवामुळे २३ मे रोजीची योजना फसली

या चोरांनी चोरी करण्यासाठी सुरुवातीला २३ मे ही तारीख निश्चित केली होती. त्या दिवशी आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व सनरायझर्स हैदराबाद यांच्यात क्रिकेट सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात बंगळुरूचा विजय होईल आणि त्यामुळे शहरांत जल्लोष साजरा केला जाईल, फटाक्यांची आतषबाजी होईल. एका बाजूला हे सगळं चालू असताना आपण चोरी करायची, जेणेकरून ही चोरी कोणाच्याही लक्षात येणार नाही असं चोरांना वाटत होतं. मात्र, त्या सामन्यात बंगळुरूचा पराभव झाला. परिणामी चोरांना त्यांची योजना पुढे ढकलावी लागली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बदलीनंतर चोरीचा प्लॅन

अटक आरोपी मरियाला हा मानागुली शहरातील कॅनरा बँकेच्या शाखेत मॅनेजर होता. पण त्याची बदली ९ मे रोजी विजयपुरा जिल्ह्यातील रोनिहाल शाखेत झाली. त्याची बदली झाल्यानंतरच बँकेत चोरी करण्याची शाखा व्यवस्थापकाची योजना होती, असं तपास करणाऱ्या पोलिसांनी सांगितलं.