Kolkata Law Student Rape Case : कोलकातामध्ये ९ ऑगस्ट २०२४ रोजी आर जी कर महाविद्यालय आणि रुग्णालयातील एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेनंतर संपूर्ण देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या घटनेनंतर आता पुन्हा एकदा कोलकाता हादरलं आहे. कोलकातामधील एका लॉ कॉलेजमधील एका विद्यार्थिनीवर कॉलेजध्येच सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
या घटनेतील पीडितेने दिलेल्या तक्रारीनंतर तीन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेनंतर संपूर्ण कोलकात्यात खळबळ उडाली आहे. या घटनेतील तीन आरोपींपैकी एक आरोपी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचा नेता असल्याची माहिती समोर आली आहे. या आरोपींना न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
तक्रारीनुसार,२४ वर्षीय पीडितेने म्हटलं की, “३१ वर्षीय मोनोजित मिश्रा याने मला लग्नाचा प्रस्ताव दिला होता. मात्र, त्याचा प्रस्ताव मी नाकारल्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला.” तक्रारीत असंही म्हटलं की, ‘आरोपी मिश्रा हा याच कॉलेजमधला माजी विद्यार्थी आणि तृणमूल काँग्रेस विद्यार्थी संघटनेचा पदाधिकारी आहे. त्याने लग्न करण्यासाठी दबाव आणला होता.’
तसेच तिने आरोप केला की, आरोपीने तिच्या प्रियकराला इजा पोहोचवण्याची आणि तिच्या पालकांना खोट्या प्रकरणांमध्ये अडकवण्याची धमकी दिली होती. घटनाक्रम सांगताना तिने तक्रारीत म्हटलं की, “आरोपीने माझ्याशी लैंगिक संबंध ठेवण्याच्या उद्देशाने जबरदस्ती केली. त्यानंतर मी नकार देत प्रतिकार केला. मी रडत-रडत त्याला मला सोडण्यास सांगितलं. मी आरोपीच्या पाया पडले, मला जाऊ देण्याची विनंती केली, पण त्याने ऐकलं नाही आणि मला गार्डच्या खोलीत घेऊन गेला”, असा आरोप पीडितेने तक्रारीत केला असल्याचं इंडिया टुडेनी एका वृत्तात म्हटलं आहे.
आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी
कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार प्रकरणातील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केलं आहे. या घटनेतील तीन आरोपींपैकी एक आरोपी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचा नेता आहे. या आरोपींना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आलं असता ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अमित मालवीय यांची सरकारवर टीका
भारतीय जनता पक्षाचे नेते अमित मालवीय यांनी या घटनेवरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्या सरकारवर जोरदार टीका केली आहे. अमित मालवीय यांनी म्हटलं की, “भयानक! २५ जून रोजी कोलकाता येथील एका महाविद्यालयात एका कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. माजी विद्यार्थी आणि दोन महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांनीच या घटनेचा समावेश असल्याचं धक्कादायक वृत्त आहे. धक्कादायक म्हणजे, तृणमूल काँग्रेसच्या एका सदस्याचाही यात सहभाग असल्याचे वृत्त आहे. आरजी करची दहशत कमी झालेली नाही, तरच बंगालमध्ये असे घृणास्पद गुन्हे दररोज वाढत आहेत. ममता बॅनर्जी यांच्या राजवटीत, पश्चिम बंगाल महिलांसाठी एक भयानक बनलं आहे. बलात्कार ही एक नेहमीची शोकांतिका बनली आहे. भाजपा संबंधित पीडिता आणि तिच्या कुटुंबाबरोबर आहोत, प्रत्येक गुन्हेगाराला शिक्षा होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही”, असं अमित मालवीय यांनी एक्सवरील पोस्टमध्ये (ट्विट) म्हटलं आहे.