वरुण गांधी यांचे पंतप्रधानांना पत्र
पिकांसाठी वैधानिक किमान आधारभूत किमतीची (एमएसपी) शेतकऱ्यांची मागणी मान्य करावी, त्याशिवाय शेतकऱ्यांचे आंदोलन संपणार नाही, अशी विनंती भाजप खासदार वरुण गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे. या आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना एक कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्यात यावी आणि आंदोलनकर्त्यां शेतकऱ्यांवरील सर्व राजकीय हेतूने केलेल्या खोट्या एफआयआर रद्द करण्यात याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.
तीन कृषी कायदे रद्द केल्याबद्दल वरुण यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. हा निर्णय आधी घेतला असता तर निष्पापांचा जीव गेला नसता, असे विधान वरुण यांनी कृषीविषयक कायदे मागे घेण्याची घोषणा केल्याच्या दुसऱ्याच दिवशी केले.
पत्रात वरुण यांनी किमान आधारभूत किंमत (एमएसपी)ची शेतकऱ्यांची मागणी मान्य करण्याची गरज अधोरेखित केली. ‘या मागणीचा ठराव झाल्याशिवाय हे आंदोलन संपणार नाही अन्यथा शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होईल, जो कोणत्या ना कोणत्या मार्गाने उफाळून येत राहील. त्यामुळे एमएसपीची वैधानिक हमी मिळणे अत्यंत आवश्यक आहे. एमएसपीच्या कायदेशीर बंधनामुळे शेतकºयंना मोठ्या प्रमाणात आर्थिक सुरक्षा मिळेल,’ असे गांधी म्हणाले.
केंद्रीय मंत्र्यावर कारवाईची मागणी
उत्तर प्रदेशातील पिलीभीत येथील खासदार असलेल्या वरुण गांधी यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात लखीमपूर खेरी हिंसाचारासाठी केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा ‘टेनी’ यांचे नाव न घेता यांच्यावर कारवाई करण्याचीही विनंती केली आहे. लखीमपूरच्या घटनेचे वर्णन करताना ‘आपल्या लोकशाहीवरील डाग’ असल्याचे वरुण गांधी यांनी म्हटले. त्या घटनेस जबाबदार मंत्र्याचे नाव न त्यांनी या घटनेत सहभागी असलेल्या केंद्र्रीय मंत्र्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, त्यामुळे निष्पक्ष चौकशी होईल, अशी विनंती केली.