प्रचारातूनही अडवाणी-जोशी यांची गच्छंती

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनाही पक्षश्रेष्ठींनी लोकसभा निवडणुकीची उमेदवारी नाकारली असल्याने लालकृष्ण अडवाणी यांच्याप्रमाणे जोशी यांचीही प्रदीर्घ कारकीर्द संपुष्टात आल्याचे मानले जात आहे. भाजपचे समन्वयक रामलाल यांनी जोशी यांना कानपूरच नव्हे तर देशातील कोणत्याही लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू नका असे स्पष्टपणे सांगितल्यानंतर जोशी यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. जोशी कानपूरचे विद्यमान खासदार आहेत.

रामलाल यांच्या ‘आदेशा’नंतर मुरली मनोहर जोशी यांनी विद्यमान लोकसभा मतदारसंघ कानपूरमधील मतदारांना तीन ओळींचे पत्र लिहून पक्षाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. रामलाल यांनी आपल्याला लोकसभा निवडणूक लढवू नये असे कळवले असल्याचे या पत्रात जोशी यांनी नमूद केले आहे. उत्तर प्रदेशमधील प्रत्येक मतदारसंघ भाजपसाठी महत्त्वाचा असल्याने जोशी यांनी पुन्हा एकदा कानपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी केलेली होती.  जोशी यांनी पक्षाची बांधणी केली आणि पक्षाचा विस्तार केला, याबद्दल पक्ष नेहमीच त्यांचा आभारी असेल. पण, उमेदवारी दिली गेली नाही म्हणून लोकांनी आक्रोश करू नये. मुलायम सिंह यादव यांनादेखील तिकीट नाकारले गेले आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्ते सिद्धार्थनाथ सिंह यांनी व्यक्त केली.

भाजपने उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांमधील स्टार प्रचारकांची यादी प्रसिद्ध केली असून लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी या बुजुर्ग भाजप नेत्यांना स्थान देण्यात आलेले नाही. लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर गेलेले हे दोन्ही ज्येष्ठ नेते यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पक्षासाठी प्रचार करणार नाहीत. उमा भारतींना मात्र पक्षाने प्रचारासाठी पाचारण केलेले आहे.

जयाप्रदा यांना भाजपची उमेदवारी

  • अभिनेत्री जयाप्रदा यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांना पक्षाने उत्तर प्रदेशमधील रामपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीही देऊन टाकली. कित्येक वर्षे मुलायम सिंह यांच्या समाजवादी पक्षात राहिल्यानंतर जयाप्रदा यांचे आता भाजपपर्व सुरू झाले आहे.
  • अखिलेश यादव यांच्या सपामध्ये अमरसिंह यांचा टिकाव लागला नाही. अमर सिंह आणि त्यांच्यानंतर जयाप्रदा हे दोघेही सपापासून वेगळे झाले. त्यानंतर दोघांचीही भाजपशी जवळीक वाढत गेली. त्यामुळे जयाप्रदा भाजपमध्ये अधिकृतपणे प्रवेश करतील असे मानले जात होते.
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Murali manohar joshi too forced retirement
First published on: 27-03-2019 at 01:46 IST