नवी दिल्ली : राज्यातील मतदारयाद्यांमधील घोळ निस्तरावेत अशी मागणी करणारे निवेदन मंगळवारी महाविकास आघाडी तसेच, मनसेच्या नेत्यांनी केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सादर केले. पण, तोपर्यंत मुंबईत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आल्यामुळे विरोधकांच्या शिष्टमंडळाला केंद्रीय निवडणूक आयुक्तांकडून कोणतेही ठोस आश्वासन मिळाले नाही.
शिवसेना-ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत व अनिल देसाई यांना सोमवारी केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी भेट दिली नव्हती. त्यामुळे आयोगाने दिलेल्या वेळेनुसार ठाकरे गटाचे दोन्ही खासदार सकाळी ११ वाजता आयोगाच्या कार्यालयात दाखल झाले. त्यांच्याबरोबर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे, मनसेचे बाळा नांदगावकर व नितीन सरदेसाई हेही होते. मात्र, आयोगाच्या अधिकाऱ्यांनी ठाकरे गटाचे सावंत व देसाई याच दोन खासदारांना केंद्रीय निवडणूक आयुक्त भेटतील असे सांगत इतरांना भेट नाकारली. यानंतर सुमारे दुपारी अडीच वाजता केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी भेट दिली.
शिष्टमंडळाची भेट घेण्यास ज्ञानेश कुमार यांनी टाळाटाळ केल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केला.
चुका दुरुस्त करण्याची विनंती
आयुक्तांना तीन पानी निवेदन देण्यात आले असून, मतदारयादीतील चुका दुरुस्त करण्याची विनंती केली आहे. या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ, शेकापचे जयंत पाटील, माकपचे अजित नवले , भाकपचे सुभाष लांडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
आम्ही विरोधक राज्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे जाऊन आमचे म्हणणे मांडले होते. पण, त्यांनीच आम्हाला केंद्रीय निवडणूक आयुक्तांकडे जाण्यास सांगितले होते. म्हणून आम्ही ज्ञानेश कुमार यांच्याकडे गेलो होते. त्यांनी फक्त दोनच खासदारांना भेटू असे म्हणणे योग्य नव्हे. लोकशाहीमध्ये राजकीय पक्षांच्या नेत्यांची बाजू केंद्रीय निवडणूक आयोगाने ऐकून घेतली पाहिजे. – अरविंद सावंत, खासदार, शिवसेना, ठाकरे गट
