Adar Poonawalla on 90-hour workweek: लार्सन अँड टुब्रोचे अध्यक्ष एसएन सुब्रह्मण्यम यांनी कर्मचाऱ्यांना आठवड्यातून ९० तास काम करण्याचे आणि रविवारीही काम करण्याचे आवाहन केले होते. भारतातील कॉर्पोरेट क्षेत्रात वर्क लाईफ बॅलन्स बाबत मोठ्या प्रमाणात चर्चा होत असताना इन्फोसिस आणि लार्सन अँड टुब्रोसारख्या जागतिक दर्जाच्या कंपन्यांच्या प्रमुखांनी अशाप्रकारचे विधान केल्यामुळे कर्मचारी वर्ग आणि सेलिब्रिटी नाराजी व्यक्त करत होते. मात्र आता उद्योग विश्वातूनही याविरोधात प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रसिद्ध उद्योगपती आणि महिंद्रा ग्रुपचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनी आठवड्यातून ९० तास काम करण्याची आवश्यकता नसल्याचे सांगितले. त्यानंतर आता सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ प्रमुख अदर पूनावाला यांनीही आनंद महिंद्रा यांची री ओढली आहे.

आनंद महिंद्रा यांनी दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलत असताना लार्सन अँड टुब्रोचे अध्यक्ष एसएन सुब्रह्मण्यम यांचे नाव न घेता आठवड्याला ९० तास काम करण्याची गरज नसल्याचे म्हटले. तसेच कामांच्या तासापेक्षा कामाच्या दर्जाला अधिक महत्त्व असल्याचे म्हटले. तसेच माझी पत्नी छान असून रविवारी तिला पाहत बसायला मला आवडते, असेही ते म्हणाले होते. अदर पूनावाला यांनी आनंद महिंद्रा यांच्या समर्थनार्थ एक्सवर पोस्ट टाकली आहे. ज्यात त्यांनीही या भूमिकेला पाठिंबा दिला.

हे वाचा >> Anand Mahindra: ‘बायकोला पाहत बसणं मला आवडतं’, आनंद महिंद्रा यांचा उपरोधिक टोला; वर्क लाइफ बॅलन्सवर सडेतोड भूमिका

अदर पूनावाला म्हणाले, “आनंद महिंद्रा आपले बरोबर आहे. माझ्या पत्नीलाही मी छान वाटतो. त्यामुळे रविवारी माझ्याकडे निरखून पाहायला तिला आवडते. कामाच्या तासांपेक्षा दर्जा कधीही अधिक महत्त्वाचा. #वर्क लाईफ बॅलन्स”

आनंद महिंद्रा काय म्हणाले?

‘कर्मचाऱ्यांनी रविवारीही काम केले पाहीजे. किती वेळ तुम्ही पत्नीला पाहत बसणार. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी रविवारीही काम केले तर मला आनंद होईल’, असे विधान लार्सन अँड टुब्रोचे अध्यक्ष एसएन सुब्रह्मण्यम यांनी केले होते. यावर उपरोधिक टोला लगावताना आनंद महिंद्रा म्हणाले, “मी सोशल मीडियावर सक्रिय असतो, याचा अर्थ मी मोकळा आहे, असे अजिबात नाही. माझी पत्नी छान आहे, तिला पाहत बसायला मला आवडतं. मी सोशल मीडियावर मित्र यादी वाढवायला आलेलो नाही. सोशल मीडिया हे एक उत्तम बिझनेस टुल आहे, म्हणून मी त्याचा वापर करतो. मला असंख्या लोकांकडून सूचना प्राप्त होतात.”

हे ही वाचा >> रविवारीही काम करण्याचा सल्ला देणाऱ्या L&T च्या अध्यक्षांना कर्मचाऱ्यांपेक्षा ५०० पट अधिक वेतन, २०२३-२४ साठी मिळाले ५१ कोटी रुपये

काय म्हणाले होते एल अँड टी चे अध्यक्ष?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये लार्सन अँड टुब्रोचे अध्यक्ष एसएन सुब्रह्मण्यम यांना कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना विचारण्यात आले की, अब्जावधी डॉलर्सची उलाढाल असलेली लार्सन अँड टुब्रो कंपनी अजूनही कर्मचाऱ्यांना शनिवारी का काम करायला लावत आहे.

याला उत्तर देताना ते म्हणाले, “रविवारी मी तुम्हाला काम करायला लावत नाही याचा मला पश्चात्ताप वाटतो. जर मी तुम्हाला रविवारीही काम करायला सांगितले तर मला जास्त आनंद होईल, कारण मीसुद्धा रविवारी काम करतो.” ते पुढे म्हणाले की, “घरी बसून तुम्ही काय करता? तुम्ही तुमच्या पत्नीकडे किती वेळ पाहणार? पत्नी तुमच्याकडे किती वेळ पाहणार? त्यापेक्षा कार्यालयात या आणि कामाला लागा.”

Adar Poonawalla jabs at 90-hour workweek
आनंद महिंद्रा यांच्यानंतर अदर पुनावाला यांनीही आठवड्याला ९० तासाच्या कामाबाबत उपरोधिक टोला लगावला.

लार्सन अँड टुब्रोचे अध्यक्ष एसएन सुब्रह्मण्यम यांचे रविवारसह आठवड्याला ९० तास काम करण्याचा सल्ला देणारे विधान सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामुळे त्यांच्यावर टीकाही होत आहे. यापूर्वी इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी आठवड्याला ७० तास काम करण्याचा सल्ला दिला होता. त्यावेळी त्यांच्यावरही जोरदार टीका झाली होती.

Story img Loader