पेशावर : अफगाणिस्तानातील नवीन सरकारची स्थापना तालिबानने शुक्रवारी लांबणीवर टाकली. आता ही स्थापना शनिवारी ( ४ सप्टेंबरला) जाहीर करण्यात येईल असे सांगण्यात आले. तालिबानचा प्रवक्ता झबीउल्ला मुजाहिद याने सांगितले, की सरकार स्थापना आता शनिवारी करण्यात येणार आहे.

तालिबानच्या कतारमधील दोहा येथे असलेल्या राजकीय कार्यालयाचे अध्यक्ष मुल्ला अब्दुल घनी बरादर हे तालिबानी सरकारचे नेतृत्व करणार असल्याचे समजते. तालिबान इराणी नेतृत्वाच्या धर्तीवर काबूलमध्ये सत्ता स्थापन करणार आहे. तालिबानचे नेते मुल्ला हैबतुल्ला अखुंडजादा हे अफगाणिस्तानचे सर्वोच्च अधिकारी असतील, असे गटाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले आहे. तालिबानच्या सांस्कृतिक व माहिती आयोगाचे वरिष्ठ अधिकारी मुफ्ती इनामुल्ला समनगानी यांनी म्हटले आहे, की  मंत्रिमंडळ स्थापनेबाबत चर्चा अंतिम टप्प्यात आहे.

इराणमध्ये सर्वोच्च राजकीय व धार्मिक पदावर एका सर्वोच्च व्यक्तीची नेमणूक केली जाते. त्याप्रमाणेच व्यवस्था अफगाणिस्तानात राहणार आहे. त्या व्यक्तीचे स्थान हे अध्यक्षांच्या वरचे असणार असून तेच लष्कर, सरकार व न्यायालयांचे प्रमुख नेमण्याचे काम करतील. सर्वोच्च नेत्यांचा शब्द राजकीय, धार्मिक व लष्करी कामकाजात अंतिम असेल. मुल्ला अखुंडजादा हे सरकारचे नेते असतील व त्यांच्या प्रमुखपदाबाबत कुठलाही प्रश्न नाही. अखुंडजादा हे तालिबानचे जुने धार्मिक नेते आहेत. यांनी गेली १५ वर्षे बलुचिस्तानातील कचलाक भागात एका मशिदीत सेवा केली आहे. नवीन प्रशासन प्रणाली, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत याबाबत अंतिम निर्णय बाकी होता. असून त्यांनी गेली १५ वर्षे बलुचिस्तानातील कचलाक भागात एका मशिदीत सेवा केली आहे.

समनगानी यांनी म्हटले आहे,की नव्या सरकारी रचनेत गव्हर्नरांच्या  हाती  प्रांतांचे नियंत्रण राहील, जिल्हा गव्हर्नर हे संबंधित जिल्ह्यांचे प्रमुख सूत्रधार असतील. तालिबानने गव्हर्नर, पोलिस प्रमुख, पोलिस कमांडर्स यांची प्रांत व जिल्ह्यांमध्ये नेमणूक केली आहे. नवीन प्रशासन प्रणाली, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत याबाबत अंतिम निर्णय बाकी आहे.