पीटीआय, बंगळुरू
कर्नाटकात नेतृत्वबदलाची चर्चा झाली नाही अशी माहिती काँग्रेसचे राज्याचे प्रभारी रणदीपसिंह सुरजेवाला आणि राज्याचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी मंगळवारी दिली. आपण मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि राज्यातील सरकारचे हात बळकट करत असल्याचे शिवकुमार यांनी सांगितले. कर्नाटकातील सत्ताधारी पक्षाच्या काही आमदारांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चेनंतर तिथे बैठकांचे सत्र सुरू आहे. मात्र, सरकारला किंवा नेतृत्वाला कोणताही धोका नसल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.
राज्यात नेतृत्वबदलाच्या मुद्द्यावर कोणीही चर्चा करू नये असे आवाहन शिवकुमार यांनी पक्षाचे नेते आणि आमदारांना केले. रामनगरचे आमदार एच ए इक्बाल हुसेन हे शिवकुमार राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत अशी विधाने करत आहेत, त्यांना नोटीस बजावण्यात येईल असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. हुसेन आणि मागडीचे आमदार एच सी बालकृष्णन यांच्यासह काही आमदारांनी या वर्षाअखेरीस शिवकुमार मुख्यमंत्री होतील असे दावे केल्यानंतर राज्यात नेतृत्वबदलाची चर्चा सुरू झाली. या मुद्द्यावर आपल्याबरोबर १०० आमदार असल्याचा दावा हुसेन यांनी केला होता.
मात्र, राज्यातील आमदार आणि खासदारांबरोबर मुख्यमंत्री बदलण्यासंबंधी कोणतीही चर्चा झाली नाही असे राज्याचे प्रभारी आणि पक्षाचे सरचिटणीस रणदीपसिंह सुरजेवाला यांनीही सांगितले. आमदार, खासदारांनी त्यांच्या मतदारसंघांमध्ये कोणती कामे केली ते समजून घेण्यासाठी आपण त्यांना भेटत आहोत असे ते म्हणाले.
काही विधाने केली जात आहेत. आम्हाला पक्षात शिस्त हवी. शिस्त महत्त्वाची आहे. नेतृत्वबदलाचा कोणताही मुद्दा नाही. यावर कोणतीही तातडीने चर्चा केली जाणार नाही. कोणालाही कसली घाई नाही, आमच्यासाठी २०२८ महत्त्वाचे आहे. – डी के शिवकुमार, उपमुख्यमंत्री