दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळ्यात अंतरिम जामीन मिळाला आहे. मात्र त्यांना हा जामीन ठराविक मुदतीपर्यंत आहे. त्याआधी त्यांना अटक करण्यात आली होती आणि त्यांची रवानगी तिहार तुरुंगात करण्यात आली होती. अरविंद केजरीवाल हे न्यायालयीन कोठडीत होते. आता अरविंद केजरीवाल यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत एक महत्त्वाचं भाष्य केलं आहे.

काय म्हटलं आहे अरविंद केजरीवाल यांनी?

सध्या तुम्ही अंतरिम जामिनावर बाहेर आहात. तुरुंगात पाठवण्यात आलेले तुम्ही पहिले मुख्यमंत्री आहात. याबाबत विचारलं असता केजरीवाल म्हणाले, “सध्याच्या घडीला देश अत्यंत कठीण काळातून जातो आहे. आपला देश आता हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल करु लागला आहे. आधी केंद्र सरकारने झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक केली. त्यानंतर मला अटक केली. खोट्या प्रकरणात आम्ही मुख्यमंत्र्यांनाही अटक करु शकतो असा संदेश त्यांनी यातून एकप्रकारे दिला आहे. लोकशाहीत लोकांचं ऐकलं गेलं पाहिजे. मात्र ते (नरेंद्र मोदी) हे लोकांना त्यांचं ऐकण्यास सांगत आहेत. यातून देश वाचला पाहिजे. मला हा एक प्रकारचा स्वातंत्र्यलढाच वाटतो. मी ज्यांना प्रेरणास्थान मानतो असे लोक त्या काळात तुरुंगातच गेलो होते. देश वाचवायचा असेल तर मी तुरुंगात जायला तयार आहे. तसंच मी किती काळ तुरुंगात राहणार हे मोदीच सांगू शकतात कारण सगळ्या गोष्टी त्यांनी ठरवल्या आहेत.” असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- “आम्ही पाचव्या टप्प्यातच ३०० पार”, अमित शाहांचा दावा; अरविंद केजरीवाल म्हणाले…

संशयावरुनही अटक केली जाते हे दुर्दैवी आहे

तुमच्या पक्षाने हा दावा केला आहे की कथित मद्य घोटाळा झालाच नाही. याविषयी विचारलं असता केजरीवाल म्हणाले, “आधी असे काही आरोप झाले की गुन्हा दाखल होत असे, त्यानंतर तपास केला जात असे, व्यक्ती दोषी आहे का? हे ठरवलं जात असे. आता सगळी उलटी गंगा वाहते आहे. ज्याच्यावर संशय आहे त्याला संशयाच्या बळावर पहिल्याच दिवशी अटक केली जाते आहे. व्यक्तीला अटक करुन तपास केला जातो. विरोधकांना उद्ध्वस्त करण्याचं काम भाजपाकडून सुरु आहे. भाजपात जा किंवा तुरुंगात जा असेच पर्याय ठेवले जात आहेत. हे सगळं चित्र लोकशाहीसाठी घातक आहे. ” असंही अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आप पक्ष संपवण्यासाठीच मला टार्गेट केलं जातं आहे

मी आम आदमी पक्षाचा नेता आहे. त्यामुळे मला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातं आहे. मला राजकीयदृष्ट्या संपवलं की आप म्हणजेच आम आदमी पक्ष संपेल असं त्यांना (भाजपा) वाटतं आहे. मला अटक करण्यात आली, माझ्यावर भ्रष्टाचाराचा ठपका ठेवला गेला. मी जर राजीनामा दिला तर उद्या आमचं सरकारही उद्या पाडतील. मात्र मी काहीही चूक केली नाही, मला अटक केल्यानंतरही मी ठाम राहिलो. त्यामुळे लोकांमध्ये हा संदेश गेला आहे की ही प्रामाणिक नेत्याला अटक करुन तुरुंगात डांबण्यात आलं पण आमचा नेता फुटला नाही किंवा शरण गेला नाही.” असंही अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत.