Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला, तर या घटनेत अनेक पर्यटक गंभीर जखमी झाले होते. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासह सिंधू पाणी करार स्थगित करण्यात आला होता. तसेच पाकिस्तानी विमानांसाठी भारताने आपलं हवाई क्षेत्र बंद करण्याचाही निर्णय घेतला.

यानंतर आता भारताने पाकिस्तानच्या विरोधात आणखी एक मोठं पाऊल उचललं आहे. भारताने पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व आयातीवर बंदी घालण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक धोरणाच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती भारत सरकारने दिली आहे. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.

पाकिस्तानमधून भारतात निर्यात होणाऱ्या सर्व वस्तूंवर आता भारतात बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, भारताच्या या निर्णयाचा फटका पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता आहे. या बंदीच्या निर्णयाअंतर्गत पाकिस्तानमधून येणाऱ्या कोणत्याही उत्पादनाच्या आयातीवर पूर्णपणे बंदी असणार आहे. एवढंच नाही तर पाकिस्तानमधून एखादी वस्तू आयात होणारी असो किंवा अप्रत्यक्षपणे दुसऱ्या कोणत्याही देशातून पाकिस्तानी वस्तू भारतात आयात होणार असेल तर त्यावरही बंदी असणार आहे.

भारत सरकारने नेमकं काय म्हटलं?

दरम्यान, वाणिज्य मंत्रालयाने या संदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेत म्हटलं आहे की, “पाकिस्तानमधून भारतात होणाऱ्या सर्व वस्तूंची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आयात किंवा वाहतूक, मग ती मुक्तपणे आयात करता येण्याजोगी असो किंवा नसो, पुढील आदेशापर्यंत प्रतिबंधित असेल. राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक धोरणाच्या हितासाठी हे निर्बंध लादण्यात आले आहेत. या निर्बंधातील कोणत्याही अपवादासाठी भारत सरकारची पूर्व परवानगी आवश्यक असेल”, असं अधिसूचनेत म्हटलं आहे.

पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार?

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाघा-अटारी सीमा देखील बंद करण्यात आलेली आहे. तसेच भारतातील पाकिस्तानी नागरिकांना देखील भारत सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. पाकिस्तानी विमानांसाठी भारताने आपलं हवाई क्षेत्र बंद केलेलं आहे. यानंतर आता पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व आयातीवर भारताने बंदी घातली आहे. त्यामुळे या सर्व निर्णयाचा परिणाम पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर होणार असल्याचं बोललं जात आहे.

टपाल आणि पार्सलची देवाणघेवाणही स्थगित

भारत सरकारने पाकिस्तानमधून हवाई आणि भूपृष्ठ मार्गाने येणाऱ्या सर्व प्रकारच्या टपाल आणि पार्सलची देवाणघेवाण स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं भारत सरकारने स्पष्ट केलं आहे.