पाकिस्तानचे लष्करप्रमुख जन. अश्फाक कयानी यांनी शनिवारी भावी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट घेऊन त्यांना देशातील सुरक्षेच्या स्थितीची माहिती दिली. शरीफ यांच्या भावाच्या निवासस्थानी कयानी आणि नवाझ शरीफ यांची भेट झाली.
कयानी आणि शरीफ यांनी जवळपास तीन तास चर्चा केली आणि एकत्र भोजनही घेतले. या वेळी पीएमएल-एन पक्षाचा अन्य एकही नेता उपस्थित नव्हता. देशातील सुरक्षेच्या स्थितीबाबतची माहिती कयानी यांनी शरीफ यांना दिली. दोन्ही नेत्यांमध्ये प्रादेशिक स्थिती आणि दहशतवादाविरोधातील लढा या बाबतही चर्चा झाली.
दहशतवादासह पाकिस्तानला भेडसावणाऱ्या अन्य समस्यांचा मुकाबला करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचे दोन्ही नेत्यांनी मान्य केले, असे सूत्रांनी सांगितले. समस्यांमधून सहीसलामत बाहेर पडण्यासाठी सर्व सुरक्षा यंत्रणा नागरी सरकारसमवेत काम पाहतील, असेही या वेळी मान्य करण्यात आले.