संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी म्हणून घोषित केलेल्यांना आश्रय देण्याचा इतिहास पाकिस्तानच्या नावे आहे, असा टोला भारताने शेजारच्या राष्ट्राला लगावला आहे. पाकिस्तानने भारतावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत जगातील सर्वात महत्वाच्या मंचांपैकी एक असणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर काश्मीरचा उल्लेख केल्याने भारताने पुन्हा एकदा पाकिस्तान हे दहशतवादाला खतपाणी घालणारं राष्ट्र असल्याचं जागतिक मंचावरुन अधोरेखित केलंय. “पाकिस्तानकडून अशाप्रकारे संयुक्त राष्ट्रांच्या मंचाचा वापर करुन जगाचं लक्ष्य विचलित करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. दहशतवाद्यांना आश्रय देण्याच्या मुद्द्यावरुन लक्ष्य विचलीत करण्यासाठी केले जाणारे हे प्रयत्न आहेत,” अशा तिखट शब्दांमध्ये भारताने पाकिस्तानला सुनावलं आहे. इतकचं नाही तर पाकिस्तानचा उल्लेख ‘ओसामा बिन लादेनला शहीद म्हणणाऱ्यांनी’ असा करत भारताने शेजारचा देश दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचं सांगतानाच काश्मीर प्रश्नात पाकिस्तानने पडू नये असा थेट इशारा दिलाय.

लादेनचा उल्लेख करत साधला निशाणा

भारताने आपला उत्तर देण्याचा अधिकार वापरत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या भाषणातील मुद्द्यांवरुन शेजाऱ्यांना खडे बोल सुनावले. पाकिस्तानचा इतिहास पाहिल्यास दहशतवाद्यांना आश्रय देणे, त्यांना मदत करणे आणि पाठिंबा दिल्याची उदाहरणं दिसून येतात असं सांगत भारताने थेट अमेरिकेवरील ९/११ हल्ल्याचा सुत्रधार ओसामा बिन लादेनचा उल्लेख केलाय. “संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या अनेकांना आश्रय देण्यामध्ये पाकिस्तान आघाडीवर आहे. ओसामा बिन लादेनला पाकिस्ताननेच आश्रय दिला. आजही पाकिस्तानचे नेतृत्व त्याचा उल्लेख शहीद असा करतं,” असा टोला भारताची बाजू मांडताना भारताच्या पहिल्या महिला सचिव स्नेहा दुबे यांनी पाकिस्तानला लगावला.

त्यांच्यामुळे सर्वांनाच होतोय त्रास

पाकिस्तान स्वत:ला आगीशी खेळणारा देश असं मानतो. मात्र त्यांनी दहशतवाद्यांना आश्रय दिल्याने त्याची झळ संपूर्ण जगाला सोसावी लागत असल्याचंही भारताने म्हटलं आहे. अमेरिकेच्या तीन दिवसीय दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित करणार आहे. यापूर्वी भारताने पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मीरसंदर्भात केलेल्या वक्तव्याला उत्तर दिलं आहे. जागतिक स्तरावरील सर्वात महत्वाच्या मंचावरुन भारताने शनिवारी हे स्पष्ट केलं आहे की जम्मू-काश्मीर आणि लडाख भारताचा अविभाज्य भाग आहे. तसेच भारताने पुन्हा एकदा पाकिस्तान हा दहशतदवाद्यांना समर्थन देणारा देश असल्याचा उल्लेख करत इम्रान खान यांच्या वक्तव्यावरुन पाकिस्तानवरच निशाणा साधलाय.

जम्मू-काश्मीर, लडाख भारताचा अविभाज्य भाग

भारताने पाकिस्तानवर हल्लाबोल करताना दहशतवाद्यांना आश्रय देणं, मदत करणं आणि त्यांना पाठिंबा देण्याचा पाकिस्तानच्या इतिहासात आणि धोरणांमध्ये दिसून येत असल्याचं म्हटलं आहे. यावरच न थांबता पाकिस्तानने अनधिकृतरित्या ताबा मिळवलेला भूभागही भारताचाच असल्याचा दावा भारताने केलाय. भारताने संयुक्त राष्ट्रांसमोर, “जम्मू-काश्मीर आणि लडाख हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि भविष्यातही कायमच तसाच राहील,” असं पाकिस्तानला ठणकावून सांगितलं आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेमध्ये बोलताना दुबे यांनी पाकिस्तानवर कठोर शब्दांमध्ये टिका केली. “आजही आपण पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या तोंडून दहशतवादाच्या घटना योग्य असल्याचा सांगण्याचा प्रयत्न झाल्याचं पाहिलं. सध्याच्या जगामध्ये दहशतवादाला अशाप्रकारे पाठीशी घालणं स्वीकार करण्याची गोष्ट नाहीय,” असा टोला दुबे यांनी लगावला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा रेकॉर्डेड संदेशाचा व्हिडीओ आमसभेमध्ये चालवण्यात आला. यात इम्रान यांनी १३ वेळा काश्मीरचा उल्लेख केला आहे. तसेच हुर्रियत नेते सैय्यद अली शाह गिलानी यांच्या पार्थिवासंदर्भात खोटा प्रचारही इम्रान यांनी आपल्या व्हिडीओतून करण्याचा प्रयत्न केला.

इम्रान खान काय म्हणाले होते?

जम्मू काश्मीरचा उल्लेख करताना या प्रदेशासाठी काय योग्य आहे हे दिल्लीने स्वत: ठरवून तसा निर्णय घेतल्याची टीका भाषणामधून इम्रान खान यांनी केली. तसेच पाकिस्तानला शांतता हवी आहे मात्र त्यासाठी भारतानेही प्रयत्न करणे गरजेचे आहे असं इम्रान म्हणाले. भारतामध्ये मुस्लिमांवर अत्याचार केले जातात असे बिनबुडाचे आरोपही इम्रान यांनी आपल्या भाषणामध्ये केले. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या शेजरी देशाने भारतालाच शांततात नको असल्याचं चित्र जागतिक मंचावरुन उभं करण्याचा प्रयत्न केला. मात्र पाकिस्तानी पंतप्रधानांनी केलेले हे खोटे दावे खोडून काढताना भारताने पाकिस्तानची कुंडलीच जगासमोर मांडली. इम्रान यांच्या याच वक्तव्यांवरुन भारताने पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून देत तुमचे नेते जगभरामध्ये दहशतवादी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओसामाला शहीद दर्जा देतात असा टोला लगावला.