एका २५ वर्षीय तरुणाची त्याचे आई-वडील आणि बहिणीने मिळून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा तरुण साखरपुड्यानंतर दुसऱ्या मुलीची चॅटिंग करायचा तसेच तो बरोजगार असल्याने त्याच्या आई-वडील आणि बहिणीने ठार मारले, असे पोलिसांनी सांगितले. ही घटना मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यात घडली आहे. मृताचे नाव रामकृष्ण सिंग असून तो बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबीयांनी दिली होती.

सहाय्यक पोलीस अधीक्षक (एएसपी) संखाराम सेंगर यांनी सांगितले की, बेपत्ता झाल्यानंतर तीन दिवसांनी, ५ जानेवारी रोजी रामकृष्ण सिंगचे हात-पाय बांधलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह रुपारेल नदीतून सापडला होता. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला. त्यानंतर, पोलिसांनी तपासाचा भाग म्हणून मोबाईल फोनचे लोकेशन ट्रेस केले, त्यातून मृताच्या कुटुंबाचा त्याला मारण्यात सहभाग असल्याचे काही संकेत आढळले, असे ते म्हणाले.

“चौकशी केली असता, त्या व्यक्तीचे वडील भीमन सिंह, आई जमुनाबाई आणि बहीण कृष्णाबाई यांनी त्याची हत्या केल्याची कबुली दिली. मृत साखरपुडा झाल्यानंतरही दुसर्‍या मुलीसोबत चॅटिंग करत होता, असे कुटुंबीयांच्या लक्षात आले, तसेच तो सतत फोनमध्ये वेळ घालवायचा आणि बरोजगार होता, त्यामुळे त्याचे कुटुंबीय त्याच्यावर नाराज होते, असं पोलिसांनी सांगितलं. यासंदर्भात एनडीटीव्हीने वृत्त दिलंय.

“२ जानेवारी रोजी झालेल्या वादानंतर, त्याच्या वडिलांनी त्याला ढकलून खाली पाडले, नंतर त्याचे डोके भिंतीवर ठेचले. तो मेला आहे हे समजून आई-वडील आणि त्याच्या बहिणीने त्याचे हात पाय बांधले आणि त्याचा मृतदेह नदीत फेकून दिला,” अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.