संशोधनात भारतीय वंशाच्या महिलेचे नेतृत्व
आपल्या आकाशगंगेच्या जवळ शनीसारखा दिसणारा एक ग्रह सापडला असून त्याचा शोध घेण्याऱ्या वैज्ञानिकात एका भारतीय वंशाच्या महिलेचा समावेश आहे. नवीन शोधलेला बाह्य़ग्रह शनी व गुरूच्या मधल्या वस्तुमानाचा असून तो सूर्याच्या निम्मे वस्तुमान असलेल्या ताऱ्याभोवती फिरत आहे. जर एक तारा दुसऱ्या ताऱ्याच्या समोर फिरत असेल तर त्याचा प्रकाश जवळच्या ताऱ्याच्या गुरूत्वीय बलामुळे वाकतो. संशोधकांच्या मते गुरूत्वीय सूक्ष्मभिंगाच्या तंत्राने हा ग्रह शोधला असून तो मातृताऱ्याच्या प्रकाशाआधारे शोधलेला नाही. मातृताऱ्याचे अस्तित्व माहिती नसतानाही यात ग्रह शोधता येतो, असे फिजिक्स ओआरजीच्या वृत्तात म्हटले आहे. अमेरिकेतील नोत्रेडेम विद्यापीठातील वैज्ञानिक अपर्णा भट्टाचार्य यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आले. हा ग्रह वायूंचा बनलेला असून तो गुरू त्वीय भिंग पद्धतीने शोधला आहे. ही गुरूत्यीय भिंगे ऑगस्ट २०१४ मध्ये शोधली गेली होती; त्यांना ओजीएलइ २०१४, बीएलजी १७६० अशी नावे दिली होती. १७६० व्या गुरूत्वीय भिंग घटनेचे संशोधन त्या वेळी केले होते. ओजीएलइ हा पोलंडचा खगोल प्रकल्प असून त्यात वॉर्सा विद्यापीठातील संशोधक कृष्णद्रव्य व सौरमालेबाहेरील ग्रहांचा शोध घेत आहेत. ओजीएलइ २०१४, बीएलजी १७६० या गुरूत्वीय भिंग घटनांच्या वेळी प्रकाशाचे किरण वाकलेले दिसले, त्यातून या ग्रहाचा शोध लागला आहे. यात प्रकाशाचा स्रोत निळा आहे. तो प्रकाश मातृताऱ्याशी जुळणारा असून हा तारा दीर्घिकेच्या फुगवटय़ात आहे. त्याच्या दुसऱ्या बाजूला तरूण तारा असण्याची शक्यता आहे. प्रकाशाचा स्रोत बायेसियन विश्लेषणाने शोधला असून त्यात प्रमाणित दीर्घिका प्रारूप वापरले आहे, त्यानुसार दीर्घिकेच्या जवळ ग्रहमाला असण्याची शक्यता आहे. संशोधकांच्या मते गुरूत्वीय भिंग प्रणाली २२००० प्रकाशवर्षे दूर असून ती आकाशगंगेसारखी असावी. ‘एआर एक्सआयव्ही’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.