बंगळूरु : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे शनिवारी मेट्रो प्रकल्पाच्या व्हाइटफिल्ड (कादुगोडी) ते कृष्णराजपुरमदरम्यानच्या १३.७१ किलोमीटर टप्प्याचे उद्घाटन केले. या प्रकल्पासाठी चार हजार २४९ कोटी खर्च आला असून, या टप्प्यात १२ स्थानके आहेत. या वेळी मोदींनी ‘मेट्रो’तून प्रवासही केला. प्रवासात ‘मेट्रो’चे कर्मचारी-कामगारांसह विविध क्षेत्रांतील नागरिकांशी संवादही साधला. मेमध्ये होणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता.
व्हाइटफील्ड (कादुगोडी) मेट्रो स्थानकावर आल्यानंतर मोदींनी प्रथम तिकीट खरेदी केले. त्यानंतर या उद्घाटनानिमित्त आयोजित प्रदर्शन पाहिले. त्यानंतर पंतप्रधानांनी उद्घाटन सोहळय़ाच्या नामफलकाचे अनावरण केले. नंतर ते ‘मेट्रो’त बसण्यासाठी फलाटाकडे निघाले. या वेळी त्यांच्यासोबत कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत व मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आदी उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या मार्गावरील प्रवासाचा वेळ ४० टक्क्यांनी कमी होईल व रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होईल. ‘बंगळूरु मेट्रो’च्या नवीन टप्प्यामुळे माहिती-तंत्रज्ञान केंद्र, निर्यात प्रोत्साहन औद्योगिक क्षेत्रे, व्यावसायिक संकुले, रुग्णालये आणि सुमारे ५०० कंपन्यांत काम करणाऱ्या पाच ते सहा लाख बंगळूरुवासीयांची सोय होईल.