राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतर्फे रामनाथ कोविंद यांना, तर काँग्रेसच्या नेतृत्त्वाखाली विरोधी पक्षांतर्फे मीरा कुमार यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, या निवडणुकीला दलित विरुद्ध दलित असं रुप दिलं जात आहे. त्याविरोधात मीरा कुमार यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत या निवडणुकीला जातीचं स्वरुप देणाऱ्यांना त्यांनी चांगलंच ठणकावलं आहे. समाजाला पुढे नेण्यासाठी जातीला एका गाठोड्यात बांधून जमिनीत पुरायला हवे, असे त्या म्हणाल्या.

मीरा कुमार यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. गुजरातमधील साबरमती आश्रमातून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या प्रचाराला आपण सुरुवात करणार आहोत, असं त्यांनी सुरुवातीलाच सांगितलं. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीला दलित विरुद्ध दलित अशा दृष्टीकोनातून पाहणाऱ्यांना त्यांनी खडे बोल सुनावले. तसंच निःपक्षतेबाबत प्रश्न उपस्थित करणारा व्हिडिओ प्रसिद्ध करणाऱ्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनाही त्यांनी उत्तर दिलं. याआधीच्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकांमध्ये अनेकदा उच्च जातीचे उमेदवार उभे होते. पण त्यावेळी कुणीही त्यांच्या जातीची चर्चा केली नाही. कधी तशी चर्चा झाल्याचेही मला आठवत नाही. कोविंद आणि मी निवडणूक लढवत आहे. म्हणूनच दलित निवडणुकीला उभे आहेत, असं बोललं जात आहे. मग आमच्यातील बाकीचे गुण गौण ठरतात. यावरून समाज आजही काय विचार करतो हे कळतं. आता तर जातीला गाठोड्यात बांधून पुरायला हवे असं मला वाटतं. समाजाला पुढे नेण्यासाठी त्याची गरज आहे, असंही त्या स्पष्टपणे म्हणाल्या. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी कोविंद यांना समर्थन दिल्याबद्दल विचारलं असता, राजकारणात असंच असतं. ही काही नवीन बाब नाही. निवडणुकीत समर्थन मिळवण्यासाठी सर्व सदस्यांना पत्र पाठवले आहे. त्यात नितीशकुमारही आहेत, असंही मीरा यांनी सांगितलं.