ज्या व्यक्तीने आपले संपूर्ण आयुष्य राष्ट्रकार्यासाठी समर्पित करुन आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले अशा राष्ट्रपिता महात्मा गांधींचा अपमान कदापिही सहन केला जाणार नाही अशा शब्दांत रॉबर्ट वढेरांनी भारतीय जनता पक्षावर टीका केली. सत्ताधारीपक्षातील राजकारणी ज्या प्रकारे क्षुद्र राजकारणात गुंतले आहेत हे पाहून मन व्यथित झाल्याचे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरांनी म्हटले आहे. महात्मा गांधींना अर्थहीन वादविवाद खेचल्यामुळे रॉबर्ट वढेरांनी भाजपवर निशाणा साधल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.

खादी-ग्रामोद्योग आयोगाच्या दिनदर्शिकेवरून महात्मा गांधींचे छायाचित्र काढून टाकण्यात आल्यानंतर त्याचे देशभरात पडसाद उमटले. भाजपवर सर्व विरोधी पक्षांनी टीका केली. त्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना हरियाणाचे मंत्री अनिल वीज यांनी म्हटले होते की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महात्मा गांधींपेक्षा मोठा ब्रॅंड आहेत तेव्हा त्यांचे चित्र हटवले हे चांगलेच झाले. त्यांच्यावरही वढेरांनी टीका केली. अनिल वीज यांनी केलेले हे विधान अतिशय मूर्खपणाचे असल्याचे वढेरांनी म्हटले. हळुहळु नोटेवरुनही महात्मा गांधींचे छायाचित्र काढले जाईल, असे वीज यांनी म्हटले होते. त्यांच्या या विधानाचा वढेरांनी निषेध केला आहे.

याआधीच, अनिल वीज यांच्या या विधानावर सर्व स्तरावरुन टीका होत असल्याचे दिसल्यावर त्यांनी आपले विधान मागे घेतले.
भाजपनेही वीज यांच्या वक्तव्याचा निषेध करत ही पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानंतर वीज यांनी हे आपले वैयक्तिक मत असल्याचे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. या वक्तव्याने कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर मी हे वक्तव्य मागे घेतो, असे वीज यांनी म्हटले.

जर, महात्मा गांधींचे छायाचित्र नोटांवरुन काढून टाकले तर बरे होईल असे म्हणत महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी आपली उद्विग्नता व्यक्त केली. भ्रष्ट राजकारणी पैशांचा वापर गैरमार्गासाठी करत आहेत. हे पाहता नोटांवरून गांधींचे छायाचित्र हटवले तर बरे होईल, असे तुषार गांधी यांनी म्हटले. अनिल वीजच्या वक्तव्याचा समाचार काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील घेतला. नरेंद्र मोदी हे महात्मा गांधी यांच्यापेक्षा मोठा ब्रॅंड आहेत असे म्हटल्यावर राहुल यांनी वीजवर टीका केली. हिटलर आणि मुसोलिनी हे देखील शक्तीशाली ब्रॅंड होते असे राहुल गांधी यांनी ट्विट केले.