RBI violet colour Rs 100 notes: भारतीय रिझर्व्ह बँकेकडून लवकरच १०० रुपयांची नवी नोट बाजारात आणली जाणार आहे. या नव्या नोटेचा फोटो नुकताच जारी करण्यात आला आहे. या नव्या नोटेचा रंग हलकासा जांभळा आहे. यामध्ये गुजरातच्या ऐतिहासिक राणीच्या विहिरीचे छायाचित्र आहे. नवी नोट बाजारात आल्यानंतर जुनी नोटही चलनात राहील. या नोटेच्या डिझाईनला म्हैसूरच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये अंतिम स्वरूप देण्यात आले आहे. याच प्रेसमध्ये २००० रूपयांच्या नव्या नोटांची छपाई होते.

या नोटेची साइज ६६ मिमी × १४२ मिमी असेल. आकाराने ही नोट सध्या अस्तिवात असलेल्या १०० रूपयांच्या नोटेपेक्षा छोटी आणि १० रूपयांच्या नोटेपेक्षा मोठी असेल. ही नोट बाजारात आल्यानंतर छपाईचा वेग वाढवण्यात येईल.

ही नवी नोट ऑगस्ट अखेरपर्यंत बाजारात येऊ शकते. या नोटेचे वैशिष्ट्य म्हणजे ही नोट होशंगाबादच्या सिक्युरिटी पेपर मिलच्या स्वदेशी पेपर आणि शाईने छापली जाणार आहे. नव्या नोटेबाबत देवास प्रेसच्या व्यवस्थापनाकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात ५०० आणि १००० रूपयांची नोट बंद करण्याची घोषणा केली होती.

त्यानंतर आरबीआयने २००० आणि ५०० रूपयांची नवी नोट जारी केली होती. आरबीआयकडून १०, ५०, २००, ५०० आणि २००० रूपयांच्या नव्या नोट जारी करण्यात आल्या आहेत. आता १०० रूपयांची नवी नोट ही लवकरच प्रसिद्ध केली जाईल. यापूर्वी ऑगस्ट २०१७ मध्ये २०० रूपयांची नवी नोट जारी करण्यात आली होती.