देशद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेला जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीचा (जेएनयू) विद्यार्थी शरजील इमामने पोलिसांकडे अनेक खुलासे केले आहेत. अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये दिलेल्या प्रक्षोभक भाषणाच्या व्हिडीओसोबत छेडछाड झाली नसून तो व्हिडीओ स्वतःचाच असल्याचंही शरजीलने स्वीकारलंय.

”मात्र, व्हिडिओचा काही भागच व्हायरल झाला आहे, एक तासाचं भाषण केलं होतं, तो पूर्ण व्हिडिओ नाहीये,” असं शरजीलचं म्हणणं आहे. भाषणावेळी उत्साहाच्या भरात सिलीगुडी कॉरिडॉरचा संपर्क तोडण्याचं विधान केलं, असंही त्याने म्हटलंय. पण, शरजीलनं विचारपूर्वक आणि रणनितीअंतर्गत भाषण दिलं होतं, असं शरजीलची चौकशी करणाऱ्या क्राइम ब्रँच आणि स्पेशल सेलच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, २५ जानेवारी रोजी बिहारच्या फुलवारी शरीफ येथे शाहीनबागप्रमाणे सीएए-एनआरसीच्या विरोधात विरोध प्रदर्शन सुरू होते. तिथे भाषण देण्यासाठी शरजील गेला असताना आपल्याविरोधात एफआयआर दाखल झाल्याचं त्याला समजलं. त्यानंतर तो अंडरग्राउंड झाला, अशी माहिती शरजीलने पोलिसांच्या चौकशीत दिली. क्राइम ब्रँचच्या सुत्रांनुसार, शरजीलने फुलवारी शरीफमध्ये आपला मोबाइल बंद केला आणि थेट काको या आपल्या गावी पोहोचला. तिथे तो पोलिसांपासून लपून राहत होता. गावात त्याच्या कुटुंबीयांचं वजन असल्याने त्याला लपण्यासाठी जागा उपलब्ध होत होती.

त्याआधी शारजीलचा भाऊ मुझम्मिल याला पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेऊन चौकशी केली होती. पोलिसांनी पहाटे ४ वाजता मुझम्मिलच्या घरावर छापा घालून त्याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीनंतरच शारजीलचा थांगपत्ता लागल्याचे सांगण्यात आले. मात्र, शारजील स्वत: दिल्ली पोलिसांपुढे शरण आल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केला आहे. दरम्यान, शरजीलला पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे.

कोण आहे शरजील इमाम, का झाली त्याला अटक?
‘जेएनयू’मध्ये पीएचडी करत असलेला शारजील हा आयआयटी, मुंबईचा माजी विद्यार्थी आहे. आसामसह ईशान्येचा भाग भारतापासून वेगळा करण्याबाबतचे भाष्य करणारी चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर त्याच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा नोंदविण्यात आला. ‘आसामला भारतापासून तोडणे ही आमची जबाबदारी असून, त्यानंतर सरकार आपले ऐकेल’, असे इमाम म्हणाला होता.