मोदी सरकारच्या अर्थसंकल्पात गरीब जनतेसाठी काहीही तरतूद नाही. येत्या काळात ३ ते ४ राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या समोर ठेवून आजचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. ANI ने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात गरीब जनतेसाठी काहीही तरतूद करण्यात आलेली नाही असंही मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे.

काय म्हटलं आहे मल्लिकार्जुन खरगे यांनी?

मोदी सरकारचा अर्थसंकल्प हा काही राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुका समोर ठेवून सादर करण्यात आला आहे. गरीब लोकांसाठी या अर्थसंकल्पात कुठलीही तरतूद करण्यात आलेली नाही. तसंच जे बेरोजगार आहेत त्यांची समस्या कशी सोडवणार? हेदेखील सांगितलेलं नाही. सरकारी नोकऱ्यांमध्ये जी पदं रिक्त आहेत ती कधी भरणार हे सांगितलेलं नाही. तसंच मनरेगाचं काय? त्याबाबतही कुठलीच घोषणा अर्थमंत्र्यांनी केलेली नाही. महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मात्र ती नियंत्रित करण्यासाठी कुठल्याही तरतुदी अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या नाहीत अशी टीका मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे.

आज मोदी सरकारच्या वतीने शेवटचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक असल्याने अर्थसंकल्प सादर केला जाणार नाही. आपल्या देशाच्या अमृत काळातील अर्थसंकल्प मी सादर करते आहे असं भाषणाच्या सुरूवातीला निर्मला सीतारमण यांनी जाहीर केलं. तसंच विविध लोकप्रिय घोषणा करत आजचा अर्थसंकल्प सादर केला. मात्र या अर्थसंकल्पावर विरोधकांनी टीका केली आहे. गरीब जनतेला दिलासा देणारा हा अर्थसंकल्प नाही असं मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे.

Video: कसा आहे केंद्रीय अर्थसंकल्प? लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांचं सविस्तर विश्लेषण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र या अर्थसंकल्पाचं कौतुक केलं आहे. सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केला आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. तसंच निर्मला सीतारमण यांचं कौतुकही केलं आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही या अर्थसंकल्पाचं कौतुक केलं आहे.