दिल्लीतील जमीन घोटाळ्यात रॉबर्ट वढेरा यांची चौकशी सुरु आहे. मात्र, या घोटाळ्या केवळ वढेराच नव्हे तर श्रीमती वढेरा आणि त्यांचे मेव्हणे राहुल गांधी यांचाही समावेश आहे, किंबहुना या घोटाळ्यातील खरा चेहरा राहुल गांधीच आहेत, असा खळबळजनक आरोप केंद्रीय मंत्री आणि भाजपाच्या नेत्या स्मृती इराणी यांनी केला आहे. तसेच राहुल गांधींनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण द्यावे अशी मागणीही त्यांनी केली आहे. नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

इराणी म्हणाल्या, गेल्या २४ तासांमध्ये विविध माध्यमांतून यासंदर्भात माहिती समोर आली आहे. याद्वारे या घोटाळ्यामध्ये गांधी-वढेरा कुटुंबाने कशाप्रकारे कौटुंबिक भ्रष्टाचार केला आहे हे दिसते. गांधी कुटुंब हे भ्रष्टाचाराचे फॅमिली पॅक आहे. रॉबर्ट वढेरा यांची सध्या या प्रकरणी चौकशी सुरु आहे. मात्र, आता तपास पथकांनी माध्यमांतील या माहितीवरही गांभीर्याने विचार करीत त्यातील तथ्ये तपासावीत आणि आपल्या कामात भर घालावी.

याप्रकरणी एच. एल. पावा यांना सी. सी. थंपी यांनी फायनान्स आणि मदत केली होती. चौकशीतही थंपी आणि पावा यांच्यामध्ये ५४ कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. युपीए सरकारच्या काळात थंपी यांचे नाव केवळ पेट्रोलिअम डील सोबतच नव्हते तर दिल्लीमधील जमीन घोटाळ्यात आर्थिक घोटाळ्यातही नाव आहे. २८० कोटींचा हा घोटाळा आहे. दरम्यान थंपी आणि आर्म डीलर संजय भंडारी यांचे नाते सर्वश्रृत आहे.

तसेच या संजय भंडारीचा जवळचा संबंध रॉबर्ट वढेरा यांच्यासोबत आहे. त्यामुळे वढेरा यांचीही संरक्षण साहित्याच्या डीलप्रकरणी सध्या ईडीकडून चौकशी सुरु आहे. युपीएच्या काळात हा भ्रष्टाचार झाला होता. त्यानंतर आता काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, युरो फायटला डील मिळावं अशी राहुल गांधींची वैयक्तिक इच्छा होती, त्यामुळे संजय भंडारी आणि राहुल गांधी यांचेही व्यावसायिक संबंध असल्याचे समोर आले आहे. यावरुन राहुल गांधी यांनी आपल्या कौटुंबिक फायद्यासाठी देशाच्या सुरक्षेशी तडजोड केली आहे, त्यामुळे त्यांनी देशाला याचे स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी इराणी यांनी केली आहे.