जम्मू-काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात दहशतवाद्यांनी गुरुवारी तीन पोलिसांचे अपहरण करुन हत्या केल्याच्या घटनेनंतर लष्कराकडून शोध मोहिम राबवण्यात येत आहे. गुरुवारनंतर आज (शुक्रवारी) ही शोध मोहिम कायम होती. दरम्यान, काल दोन दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर आज तीन दहशतवाद्यांना सुरक्षा रक्षकांनी कंठस्नान घातले. त्यामुळे आत्तापर्यंत पाच दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. हे सर्वजण लष्कर-ए-तोयबाचे सदस्य होते.


बांदीपोरातील जंगलात लपून बसलेल्या दहशतवाद्यांविरोधात सुरु असलेल्या या मोठ्या मोहिमेत लष्कराच्या जवानांबरोबर पोलीस आणि सीआरपीएफचे पथकही सहभागी झाले आहे. या क्षेत्रात सुरु असलेल्या मोहिमेत शुक्रवारी तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले.

ठार करण्यात आलेले सर्व दहशतवादी हे पाकिस्तानी असून लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचे सदस्य आहेत. जम्मू-काश्मीर पोलिसांच्या माहितीनुसार या पाचही दहशतवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. या दहशतवाद्यांच्या गटात सहा ते आठ लोक असण्याची शक्यता सुरक्षा रक्षकांनी व्यक्त केली आहे. यांपैकी पाच जणांचा खात्मा झाला आहे. तर आणखी तीन लोक लपून बसले असावेत. अजूनही या भागात शोध मोहिम सुरुच आहे.