आजकाल लोकांना सोशल मीडियाची प्रचंड क्रेझ आहे. सोशल मीडियावर फोटो किंवा व्हिडीओ टाकणं, अनेकांसाठी नित्याचं काम झालंय. अशातच काही व्हिडीओमुळे लोकांना नोकरी देखील गमवावी लागते. असाच एक प्रकार गुजरातमधून समोर आला आहे. प्रवासादरम्यान व्हिडीओमध्ये डान्स करतानाचा पोलिसांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर या व्हिडीओतील तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. गुजरातच्या कच्छ-गांधीधाम पोलिसांचे तीन कर्मचारी व्हिडीओत डान्स करताना आढळले होते. बुधवारी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला, ज्यामध्ये गणवेशात चार पोलीस कर्मचारी ते प्रवास करत असलेल्या वाहनात वाजवलेल्या गाण्यांवर नाचत होते. या व्हिडीओत पोलीस कर्मचारी सुरक्षा बेल्ट किंवा मास्क घातलेले दिसत नव्हते.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, कच्छ-गांधीधामचे पोलिस अधीक्षक मयूर पाटील यांच्या कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या निवेदनात, गांधीधाम ए विभाग पोलीस ठाण्यातील जगदीश सोलंकी, हरेश चौधरी आणि राजा हिरागर या तीन कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे.

“मीडिया आणि अनेक सोशल मीडिया चॅनेलद्वारे एक व्हायरल व्हिडीओ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला गेला. ज्यामध्ये पोलीस कर्मचारी पोलिसांचा गणवेश परिधान करून, चारचाकी वाहनात गाण्यांवर नाचताना दिसत आहेत. वाहन चालवताना वाहतूक नियम मोडण्याची अशी कृत्ये पोलिसांना शोभत नाहीत. असे कृत्य शिस्तबद्ध विभाग म्हणून ओळख असलेल्या पोलीस विभागाचे नाव बदनाम करते,” असे निवेदनात म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“व्हिडीओमध्ये दिसणार्‍या चार पोलिसांपैकी गांधीधाम ए डिव्हिजन पोलीस ठाण्यातील तिघांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे, तर बनासकांठा पोलिसांशी संलग्न असलेल्या चौथ्या कर्मचार्‍यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस करणारे पत्र बनासकांठा पोलीस अधीक्षकांना लिहिले आहे,” असे निवेदनात सांगण्यात आले आहे.